नाशिक – शहरातील पाथर्डी फाट्यावरील आनंद ॲग्रो कंपनीच्या दुकानात प्रो चिकनमध्ये अळ्या निघाल्याचा दावा एका ग्राहकाने केल्यानंतर कंपनीचे शहरातील सर्व दुकाने बंद करावीत, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने केली असून दुकान बंद करावयास भाग पाडून संताप व्यक्त केला. दुसरीकडे, सहा लाख रुपये न दिल्यास बदनामी करण्याची धमकी ग्राहकाने दिली असून संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कंपनीच्या वतीने इंदिरानगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील नामांकित असलेल्या आनंद ॲग्रो कंपनीच्या प्रो चिकनची शहरासह जिल्ह्यात दुकाने आहेत. यापैकी पाथर्डी फाटा परिसरातील दुकानातून ईश्वर माळी हे मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान चिकन घेऊन गेले. त्यानंतर थोड्या वेळाने दुकानात परत येत त्यांनी चिकनमध्ये अळ्या निघाल्याचा दावा केला. या प्रकाराची दखल घेत आनंद ॲग्रोच्या प्रो चिकन विक्रीच्या दुकानांविरुद्ध शिवसेना ठाकरे गटाची महिला आघाडी आक्रमक झाली. पदाधिकाऱ्यांनी इंदिरानगर येथील दुकानात जात चिकन विक्रीला बंदी केली. यावेळी श्रृती नाईक, व्दारका गोसावी, सुनीता रोटे, भाग्यश्री जाधव, प्रगती सोनार, अश्विनी बाविस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.

हेही वाचा – सिन्नर औद्योगिक वसाहतीत ३१४ किलो भेसळयुक्त पनीरसाठा जप्त

प्रकरणात राजकीय हस्तक्षेप

पाथर्डी फाटा येथील दुकानातील प्रो चिकनमध्ये चक्क किडे सापडले. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. याबाबत काही राजकीय हस्तक्षेप होत असून या दुकानांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही नाशिकचे नाव खराब होऊ देणार नाही. स्वतःसह आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. – श्रृती नाईक (ठाकरे गट महिला आघाडी पदाधिकारी)

अफवांवर विश्वास ठेवू नये

पाथर्डी परिसरात आलेला ग्राहक सकाळी नऊ वाजता चिकन घेऊन गेला. तो दुपारी एक वाजता परत आला. कुठल्याही चिकनमध्ये आळी तयार होऊ शकत नाही. चिकनबाबत ग्राहकाने दिखावेगिरी केली आहे. वास्तविक ते चिल्ड चिकन होते. ग्राहकासमोर त्याचे भाग करुन त्याच्या हातात देण्यात आले. यात ग्राहकाची फसवणूक झालेली नाही. ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. – उद्धव अहिरे (आनंद ॲग्रो)

हेही वाचा – नाशिक : शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद

चिल्ड चिकनमध्ये अळी होणे अशक्य

निरोगी व चांगल्या दर्जाचे जिवंत पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने कापून सर्व रक्त काढून चिल्ड चिकन करण्यात येते. हे चिकन क्लोरिनेटेड पाण्याने स्वच्छ धुतले जाते. स्वच्छ चिकन ३० मिनिटे चिल्ड केले जाते. आरओ पाण्याच्या बर्फात आणि बंद खोक्यात संपूर्ण पक्षी ठेवण्यात येतो. तापमान शून्य ते चारदरम्यान असते. ग्राहकाच्या मागणीनुसार त्याच्यासमोर ते कापून दिले जाते. या तापमानात कोणतीही अळी किंवा जीव तयार होऊ शकत नाही. ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. – डॉ. अश्विन माहूरकर (आनंद ॲग्रो प्रो चिकन)