नाशिक: लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज खरेदी व भरण्याची लगबग सुरू झाली असून पहिल्याच दिवशी नाशिकसाठी ४७ उमेदवारांनी ८७ अर्ज घेतले तर दिंडोरीसाठी १७ उमेदवारांनी ४० अर्ज घेतले. पहिल्या दिवशी दिंडोरीत माकपतर्फे जिवा पांडू गावित आणि या पक्षाचे डमी उमेदवार म्हणून सुभाष चौधरी या दोघांनी तर नाशिकमध्ये शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना सायंकाळपर्यंत महायुतीकडून नाशिकच्या जागेवर उमेदवार निश्चित झालेला नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अधिसूचना प्रसिध्द झाल्यानंतर पहिल्या दिवशी दोन्ही मतदारसंघात उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची रीघ लागली होती. दिवसभरात एकूण ६४ उमेदवारांनी १२७ उमेदवारी अर्ज घेतले. यात नाशिक मतदारसंघासाठी खासदार. गोडसे यांच्यासह, राष्ट्रवादीचे दिलीप खैरे, वंचितचे उमेदवार करण गायकर, माजी महापौर दशरथ पाटील, शांतिगिरी महाराज, सिध्देश्वरानंद सरस्वती, स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती, पराग वाजे यांच्यासह एकूण ४७ जणांचा समावेश आहे. दिंडोरीसाठी महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार, माकपचे जिवा पांडू गावित, महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांच्यासह १७ उमेदवारांनी अर्ज घेतले.
हेही वाचा : नाशिक मनपा शाळांमध्ये पोषाख संहितेची तयारी, शिक्षिकांकडून प्रतिसाडी एक हजार रुपयांचे संकलन
जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य इमारतीत दोन्ही मतदारसंघाचे अर्ज वितरण आणि स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी दोन्ही मतदार संघात तीन अर्ज दाखल झाले. दिंडोरीसाठी माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन करीत आपला अर्ज दाखल केला. माकपकडून सुभाष चौधरी यांचा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यात आला आहे. शांतिगिरी महाराजांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. सोमवारी त्यांच्याकडून शक्ती प्रदर्शन करीत दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. नाशिक आणि दिंडोरी दोन्ही मतदारसंघात पहिल्याच दिवशी ६४ उमेदवारांकडून १२७ अर्जांची खरेदी करण्यात आली.
हेही वाचा : आचारसंहितेत नाशिक जिल्ह्यात साडेपाच कोटीचा मद्यसाठा, अमली पदार्थ जप्त
नाशिकचा संघर्ष कायम ?
महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागेचा संघर्ष अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत कायम राहिला. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी तथा भुजबळांचे निकटवर्तीय दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज नेले. आदल्या दिवशी राष्ट्रवादीने नाशिकवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा हक्क असल्याचा ठराव केला होता. शिवसेना शिंदे गट हा मतदारसंघ मित्रपक्षांना सोडण्यास तयार नाही. या एकंदर परिस्थितीत दोन्ही पक्षांतील इच्छुकांकडून अर्ज नेले गेले. पण, या जागेवर आपला दावा सांगणाऱ्या भाजपकडून कुणी उमेदवारी अर्ज नेला नसल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहे.