नाशिक – चारचाकी गाडीतून विक्रीसाठी नेत असलेल्या पाच लाख रुपयांचा मॅफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थांचा साठा नाशिक अमली पदार्थ विरोधी पथकाने ताब्यात घेतला. या प्रकरणी दोघांसह एका महिलेविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील वर्षी मुंबई पोलिसांनी एमडी प्रकरणात केलेल्या कारवाईनंतर नाशिकरोड परिसर चर्चेत आला. नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथकाने या प्रकरणात अन्य काही संशयितांना ताब्यात घेत अड्डे उदध्वस्त केले होते. यानंतर शहरातील कॅफे, कॉफी शॉपसह काही ठिकाणी कारवाई करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Mumbai-Howrah Mail Bomb Threat: हावडा-मुंबई मेल बॉम्बने उडवण्याची धमकी; जळगाव रेल्वे स्थानकात दोन तास तपासणी

अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वतीने सातत्याने वेगवेगळ्या कारवाया सुरू असताना शहरात एमडीची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. फैसल शेख (२६), शिबान शेख (२४) आणि शिबानची पत्नी हिना शेख (२९, रा. आर्टिलरी सेंटर रोड) हे वाहनातून नाशिकरोड बस स्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागून सत्कार पॉईंटकडे जात असताना श्रध्दा दे हॉटेलजवळ अमली विरोधी पथकाने वाहन थांबवले. वाहनाची झडती घेतली असता त्यात ९९.५ ग्रॅम वजनाचा सुमारे चार लाख ९७,५०० रुपयांचा मॅफेड्रोन हा अमली पदार्थ मिळून आला. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त संदीप मिटके, निरीक्षक सुशीला कोल्हे, सहायक निरीक्षक सचिन चौधरी यांनी केली. नाशिकरोड पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली असून हिना हिलाही अटक करण्यात येणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik anti narcotics squad seized md drug stock worth five lakh rupees zws