नाशिक – जिल्हा परिषदेच्या सरळसेवा पदभरती २०२३ अंतर्गत पात्र ठरलेल्या ८१८ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले असून यामध्ये पेसा क्षेत्रातील ६४६ तर, बिगर पेसा क्षेत्रातील १७२ उमेदवारांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदांमधील पदभरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. पाच ऑगस्ट २०२३ रोजी याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील पदे भरण्यासाठी शासनाने आयपीबीपीएस संस्थेशी करार केला होता. आयपीबीपीएस संस्थेकडून विविध संवर्गातील पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. सदर संस्थेकडून परीक्षेचा निकाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर टाकण्यात आला. गुणानुक्रमे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मूळ शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करुन गुणवत्तेनुसार अंतिम निवड व अंतिम प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली. अंतिम यादीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. तसेच शिक्षकांची रिक्त पदे पवित्र पोर्टलव्दारे भरण्यात आली आहेत.
हेही वाचा – जातीपातीसह धार्मिक राजकारणापासून दूर – अजित पवार यांचे प्रतिपादन
हेही वाचा – नाशिक : समाज माध्यमांत धार्मिक तेढ निर्माण करणारी चित्रफित, गुन्हा दाखल
अनुसूचित क्षेत्रात पेसा संवर्गातील सरळसेवेची पदे मानधन तत्वावर भरण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय आणि ग्रामविकास विभागाकडील पत्र तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका २२१०९/२०२३ च्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून पेसा क्षेत्रात गुणवत्तेनुसार उमेदवारांना मानधन तत्वावर नियुक्या देण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या १५९७ पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये आतापर्यंत पेसा क्षेत्रातील ६४६ तर बिगर पेसा क्षेत्रातील १७२ उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.