नाशिक – देवळाली कॅम्पमधील जुन्या स्टेशनवाडीतील रखडलेल्या काँक्रिट रस्त्यावरून रेल्वे पोलीस आणि आमदार सरोज आहिरे यांच्यात शुक्रवारी वाद झाला. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागीय अधिकारी इति पांडे यांनी आमदार अहिरे यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असता मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी आपल्यावर गुन्हा दाखल झाला तरी हरकत नाही, असे आव्हान अहिरे यांनी दिले.

रेल्वे हद्दीलगत स्टेशनवाडी येथे सुमारे तीन हजारांची लोकसंख्या असलेली वस्ती आहे. त्यांना अनेक वर्षांपासून ये-जा करण्यासाठी पक्का रस्ताच नाही. या नागरिकांच्या सोयीचा ठरणारा रहदारीचा रस्ता हा मध्य रेल्वेच्या हद्दीतून जातो. यासाठी आमदार निधीतून ५० लाख रुपये खर्च करून या रस्त्याच्या काँक्रिटीकरणास शुक्रवारी सकाळी सुरुवात झाली. परंतु, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून रेल्वे सुरक्षा दलास या ठिकाणी बोलावून आमदारांनी सुरु केलेले काम विनापरवानगी सुरु असल्याचे सांगत काम थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हेही वाचा – नाशिक : गोदापात्रातील बांधकामाविरोधात आंदोलनात मविआही सहभागी

हेही वाचा – नाशिक, मालेगावात डेंग्यू नमुने तपासणी प्रयोगशाळेचा प्रस्ताव, चाचणीसाठी नवीन संच उपलब्ध

जेसीबी आणि इतर वाहने जप्त करण्यास रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक हरफुलसिंग यादव यांनी सांगितले. अहिरे यांनी खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री दादा भुसे यांना भ्रमणध्वनीद्वारे सर्व प्रकाराची माहिती दिली असता आम्ही मध्य रेल्वेच्या यंत्रणेशी बोलून घेऊ, तुम्ही काम सुरु राहू द्या, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे हे देखील घटनास्थळी आले. त्यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, रेल्वे सुरक्षा दलाने या ठिकाणी अधिकची कूमक मागवली. रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक सुरक्षा आयुक्त जे. पी. मौर्य हे देखील हजर झाले. रस्ता मध्य रेल्वेच्या हद्दीत येत असल्याने आपण तो करू नये यासाठी आमदारांवर दबाब आणण्याचा प्रयत्न केला. आपण येथे रस्ता कामास सरुवात करण्यात आधी भुसावळ मंडळाला पत्र दिल्याचे आमदार अहिरे यांनी सांगितले. सुमारे तीन हजार लोकवस्ती असलेल्या स्टेशनवाडीसाठी आपण रस्ता केल्याशिवाय येथून हलणार नसल्याचा निश्चय आहिरे यांनी केला.