नाशिक : दिंडोरी तालुक्यातील पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ननाशी दूरक्षेत्र येथे भरवस्तीत बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून एकाची कुऱ्हाडीचे वार करुन हत्या करण्यात आली. हत्येनंतर संशयित मयताचे शीर घेऊन कुऱ्हाडीसह पोलीस ठाण्यात पोहोचल्याने पोलीसही हादरले.
ननाशी गावातील गुलाब वाघमारे, सुरेश बोके आणि विशाल बोके यांच्यात काही कारणावरून दोन वर्षांपासून वाद सुरु होता. या वादाच्या कारणावरून वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल झाली होती. ननाशीतील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ नववर्षातील पहिल्या दिवशीच्या सकाळी गुलाब, सुरेश आणि विशाल यांच्यांतील वाद पुन्हा उफाळून येऊन त्याचे रुपांतर हाणामारीत झाले.
हेही वाचा…शहरातून ७४ नायलाॅन मांजा विक्रेते हद्दपार, पोलीस आयुक्तांची कारवाई
सुरेश आणि विशाल यांनी गुलाबचे मुंडके कुऱ्हाडीने धडावेगळे केले. त्यानंतर बोके बंधुंनी मयत गुलाबचे मुंडके आणि हत्यार घेऊन ननाशी दूरक्षेत्र पोलीस ठाणे गाठले. ते दृश्य पाहून उपस्थित पोलीस कर्मचारीही हादरले. या हत्येमुळे ननाशीत तणाव निर्माण झाला असून गावात पोलिसांची कुमक दाखल झाली आहे.