नाशिक – आतापर्यंत एटीएम फोडून त्यातून रक्कम लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु, चक्क संपूर्ण एटीएम यंत्रच चोरून पोबारा केल्याची घटना सटाणा तालुक्यातील लखमापूर येथे घडली. महत्वाचे म्हणजे चोरलेले एटीएम गाडीत घालून पळून जात असताना चोरट्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जागरूक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. हे चोरटे सद्यस्थितीत छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात असून लवकरच त्यांना सटाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सटाणा शहरासह तालुक्यातून एटीएम यंत्र फोडून त्यातील लाखो रुपयांच्या रकमेवर डल्ला मारण्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. परंतु, थेट एटीएम यंत्रच चोरून नेल्याची घटना तालुक्यातील लखमापूर येथे घडली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत प्रफुल्ल पवार यांनी सटाणा पोलिसात तक्रार दिली.
हेही वाचा – नाशिक : उत्पादन शुल्कच्या वाहनास धडक देणारे दोन दारू तस्कर ताब्यात
गुरुवारी पहाटे एक ते सकाळी सात या वेळेत लखमापूर बस स्थानकाजवळील एटीएम केंद्र चोरण्यात आले. या एटीएममध्ये एक लाख ७५ हजार ८०० रुपये एवढी रक्कम होती. या रकमेसह संपूर्ण एटीएम यंत्र चोरून नेल्याप्रकरणी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सटाणा पोलिसांकडून तपास सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील तलवाडा परिसरात हेच एटीएम यंत्र गाडीतून पळवून नेणाऱ्या दोघांना स्थानिक शेतकऱ्यांनी शिताफीने पकडले आणि पोलीस येईपर्यंत बांधून ठेवल्याचे पुढे आले. विष्णू आकात (२९, सातोना, जालना) व देवा तावडे (२०, पुंडलिक नगर,जालना) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांचा एक सहकारी फरार झाला. चोरट्यांना पकडल्यानंतर पोलिसांना फोन लावताच चोरटे झटका देत पळाले. एकाने विहिरीत उडी घेतली. त्याला नागरिकांनी दोरखंडाने बाहेर काढले. तर दुसऱ्याला पाठलाग करून पकडले. शिऊर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून चारचाकी वाहन, एटीएम यंत्र ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.