नाशिक : प्रतिबंधित नायलॉन मांजा दुचाकी वाहनधारकाच्या जिवावर बेतत असताना दुसरीकडे तो शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित होण्यास कारक ठरला. वाहिन्यांमध्ये अडकलेला नायलॉन मांजा तुटता तुटत नाही. पतंग उडवणाऱ्यांकडून तो खेचला जातो. या स्थितीत वाहिन्या एकमेकांवर घासल्या जाऊन प्रणालीत दोष उद्भवण्याचे प्रकार घडले. वीज खांब व वाहिन्यांमध्ये अडकलेला नायलॉन मांजा काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

पतंगोत्सवात नायलॉन मांजाच्या वापराला बंदी असूनही वेगवेगळ्या घटनांमधून त्याचा सर्रास वापर झाल्याचे पहायला मिळाले. नायलॉन मांजाने पाथर्डी फाटा-वडनेर रस्त्यावर दुचाकीस्वार युवकाला जीव गमवावा लागला. हा मांजा अडकून काही दिवसात अनेक दुचाकीस्वार जखमी झाले. मकरसंक्रातीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी नायलॉन मांजाने वीज वितरणातही अडथळे आले. वाहिन्यांमध्ये अडकलेला नायलॉन मांजा अनेक भागात वीज खंडित होण्याचे कारण ठरल्याचे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सांगतात. कामटवाडे व परिसरात तीन, चार वेळा नायलॉन मांजा अडकल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित झाला. वाहिन्यांवर अडकलेला नायलॉन मांजाची ओढाताण केली गेली. काही ठिकाणी दोन वाहिन्या परस्परांवर घासल्या गेल्यामुळे रोहित्र बंद (ट्रीप) होण्याचे प्रकार घडले. दिवसभरात अनेक भागातून या स्वरुपाच्या तक्रारी येत होत्या, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा…नंदुरबारमधील शिक्षकाला मोहजाळात अडकवून १२ लाख रुपयांची मागणी

वीज कर्मचाऱ्यांची कसरत

पतंग उडवणाऱ्याला मांजा कुठे अडकला ते कळत नाही. तो मांजा तुटेपर्यंत ओढत बसतो. नायलॉन मांजा लवकर तुटत नसल्याने वाहिन्या परस्परांवर घासल्या जाऊन वीज पुरवठ्यात अडथळे आले.

अशाप्रसंगी वीज दाब वाढून टीव्ही, फ्रिज, संगणक जळण्याची शक्यता बळावते. वीज खांबावर नायलॉन मांजा अडकला असेल तर, तो काढता येतो. परंतु वाहिन्यांवर मध्यभागी अडकलेला मांजा काढण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. दोरी वा उंच शिडीसारख्या व्यवस्थेचा वापर करावा लागतो. वाहिन्यांमध्ये अडकलेला दोरा हाताने तुटत नाही. पकड वा कटरने तो तोडावा लागतो, असे वीज कर्मचारी शहाबाज अहमद शेख यांनी सांगितले.

Story img Loader