नाशिक – राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच आचारसंहिता लागू झाल्याने दुपारनंतर प्रशासनाकडून शहर परिसरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले राजकीय फलक काढण्यास सुरूवात झाली. नाईलाजाने का होईना महापालिकेला फलक काढावे लागत असल्याने फलकांमुळे घुसमटलेले शहरातील रस्ते, चौक काही दिवस का असेना मोकळे दिसतील.
महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी कधीपासूनच तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि अवघ्या दोन आठवड्यावर आलेल्या दिपोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी इच्छुकांकडून सर्वत्र फलकबाजी करण्यात आली होती. शहराच्या मुख्य रस्त्यांवरील दुभाजकांजवळील विद्युत खांब, कमानी, चौक, वाहतूक बेटे, यासह मिळेल त्या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी फलकबाजी करण्याची स्पर्धा लागली होती. यामध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींसह इच्छुकांनी लहान-मोठ्या आकारात फलक लावत नागरिकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. याशिवाय, राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणारे फलक, नेत्यांच्या दौऱ्याच्या वेळी त्यांचे स्वागत करणारे फलक लावल्याने शहरातील रस्त्यांचा श्वास कोंडला होता. कुठलेही नियोजन न करता सुरू असलेल्या फलकबाजीमुळे काही ठिकाणी फलक पडून किरकोळ अपघातही झाले. मात्र इच्छुकांना त्याविषयी काहीही देणेघेणे नव्हते.
हेही वाचा – नाशिक : जिल्हा परिषदेत ८१२ उमेदवारांना नियुक्तीचे आदेश
अवैधरित्या लावण्यात आलेले फलक काढण्यासंदर्भात महापालिकेकडे अनेकांनी तक्रार केली. माध्यमांनीही महापालिका आयुक्तांचे या विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु, अखेरीस त्यासाठी आचारसंहिता लागू होण्याची नाशिकककरांना वाट पाहावी लागली.
हेही वाचा – नाशिक : समाज माध्यमांत धार्मिक तेढ निर्माण करणारी चित्रफित, गुन्हा दाखल
मंगळवारी आचारसंहिता जाहीर होताच प्रशासनाच्या वतीने शहर परिसरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले फलक काढण्यास सुरूवात झाली. महापालिकेच्या संबंधित विभागाने सिडको, सातपूर, गंगापूर रोड, पंचवटी, नाशिकरोड आदी ठिकाणी फलक काढण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू ठेवले.