नाशिक : रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘नाशिक भूषण २०२३’ पुरस्कार सामाजिक, साहित्य आणि कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या फ्रेंड्स सर्कलचे संचालक जयप्रकाश जातेगावकर यांना जाहीर झाला आहे. तर रोटरी भूषण पुरस्कार डी. विजय फार्माचे संचालक विजय दिनानी आणि प्रख्यात सनदी लेखापाल उदयराज पटवर्धन यांना घोषित करण्यात आला आहे.
बुधवारी महाकवी कालिदास कला मंदिरात सायंकाळी पाच वाजता रोटरीचे प्रांतपाल डॉ. आनंद झुनझुनुवाला, अभिनेते तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अभिनेते तथा खासदार डाॅ. अमोल कोल्हे आणि मराठी बाणाचे निर्माते अशोक हांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>>अजित पवार यांची आयान कारखान्याला गुपचूप भेट अन्…
नाशिक ही जन्मभूमी अथवा कर्मभूमी असून ज्यांनी स्वत:च्या कर्तृत्वाने स्वत:बरोबर नाशिकचे नाव उज्ज्वल केले, अशा व्यक्तींना ‘नाशिक भूषण’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याची संकल्पना १९९६-९७ पासून रोटरी क्लब राबवित आहे. रोटरी क्लबच्या पुरस्काराने याआधी कुसुमाग्रज तथा तात्यासाहेब शिरवाडकर, प्रा. वसंत कानेटकर, शांताबाई दाणी, वसंतराव गुप्ते आदींना सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचे नाशिक भूषण जातेगावकर यांची नाशिक ही कर्मभूमी असून साहित्य, नाट्य, कला आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे अतुलनीय काम आहे.
हेही वाचा >>>नाशिक: दुकान निरीक्षकास लाच स्विकारताना अटक
रोटरी क्लब ऑफ नाशिक ही संस्था ७८ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेच्या माध्यमातून विविध भागात लोक विकासाचे प्रकल्प राबविण्यात आले. सामाजिक विकासात आपले बहुमोल योगदान देणाऱ्या रोटरी संस्थेच्या सहकाऱ्यांचा देखील यथोचित सन्मान व्हावा, या उद्देशाने संस्थेचे अध्यक्ष प्रफुल बरडीया यांनी या वर्षीपासून रोटरी भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. हा पहिला सन्मान डी. विजय फार्माचे संचालक विजय दिनानी आणि प्रख्यात सनदी लेखापाल उदयराज पटवर्धन यांना घोषित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष बरडिया, सचिव ओमप्रकाश रावत, पुरस्कार समितीचे अध्यक्ष शशिकांत पारख, जनसंपर्क संचालक संतोष साबळे आदींनी केले आहे.