नाशिक : महायुतीत लोकसभेच्या नाशिक जागेवरून शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील वाद शिगेला पोहोचला असून ही जागा शिवसेनेला देण्यास भाजपने कडाडून विरोध केला आहे. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी युती धर्म पाळला नाही. केंद्र सरकारकडून निधी घेऊन विकास कामे करताना सातत्याने भाजपच्या नेत्यांना डावलल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. परिणामी, उमेदवारी जाहीर होऊनही गोडसेंची उमेदवारी आणि शिंदे गटाची ही जागा अडचणीत आली आहे. भाजपचे आरोप गोडसे यांनी फेटाळत युतीधर्म पाळल्याचा दावा केला.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊनही महायुतीत नाशिकच्या जागेचा घोळ मिटलेला नाही. उलट शिवसेना शिंदे गटाची जागा आपल्याकडे खेचून घेण्याचा चंग भाजपने बांधला आहे. त्यावरून दोन्ही बाजूंमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. पक्षाच्या मेळाव्यात डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खासदार गोडसे यांची परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने भाजप नेत्यांनी आधीच नाराजी व्यक्त केली होती. आता गोडसेंवर थेट आक्षेप घेतले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी गोडसे यांच्यावर युतीधर्म पाळला नसल्याचा आरोप केला.
हेही वाचा…नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांना प्रचारासाठी अधिक कालावधी, जिल्ह्यात २२ मतदान केंद्र संवेदनशील
नाशिक मतदारसंघात आधी भाजपचे खासदार होते. २०१४ आणि २०१९ मध्ये ही जागा शिवसेनेला दिली गेली. भाजपने त्यांना विजयी करण्यासाठी काम केले. परंतु, विकास कामांचे उद्घाटन करताना गोडसेंनी भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले नाही. अनेकदा पंतप्रधान मोदी यांचे छायाचित्र फलकावर वापरले नाही. भाजपची शहरात संघटनात्मक ताकद आहे. त्यामुळे ही जागा सोडण्याचा विषय भाजपने प्रतिष्ठेचा केला आहे.
हेही वाचा…आमदार आमश्या पाडवी यांची पाऊले शिंदे गटाकडे? ठाकरे गटाला पुन्हा एक धक्का
भाजपचे आरोप गोडसे यांनी फेटाळले. विकास कामांचे उद्घाटन करताना भाजपच्या नेत्यांची छायाचित्रे वापरली. आम्ही युती धर्माचे पालन केले. उध्दव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख असताना त्यांची वेगळी भूमिका होती. तेव्हा जमत नव्हते. परंतु, दोन वर्षापासून शिवसेना युतीधर्म पाळत असल्याचा दावा त्यांनी केला.