नाशिक – वारसा हक्काने वाटणी झालेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद लावून देण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी दलाल आणि चांदवड तालुक्यातील महिला तलाठीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदाराची चांदवड तालुक्यातील तळवाडे येथे शेतजमीन आहे. वारसा हक्काने हिस्सा वाटणी झालेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद लावून देण्यासाठी खासगी दलाल ज्ञानेश्वर बरकले (३४, परसूल, चांदवड) याने आठ हजार रुपयांची मागणी केली होती. शेलू गटाच्या तलाठी विशाखा गोसावी (३७, आर्यावर्त सोसायटी, महाराणा प्रताप चौक, सिडको) यांच्या संमतीने तडजोडीअंती चार हजार रुपये घेण्याचे ठरले. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने संशयितांना पकडले. या प्रकरणी दलाल बरकले आणि तलाठी गोसावी यांच्याविरुद्ध चांदवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित तलाठीच्या झडतीत भ्रमणध्वनी मिळाल्याचे विभागाने म्हटले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून उपअधीक्षक संतोष पैलकर यांनी काम केले. सापळा पथकात हवालदार दिनेश खैरनार, अविनाश पवार, चालक पोलीस शिपाई परशुराम जाधव यांचा समावेश होता.