नाशिकमध्ये पहाटे भीषण दुर्घटना घडली. नाशिक-औरंगाबाद मार्गावर नांदूरनाका येथे एका खासगी प्रवासी बसला भीषण आग लागल्याने ही दुर्घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. याशिवाय बसला आग लागल्याने अनेकजण गंभीररित्या भाजले गेल्याने, त्यांच्यावर आता रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, मदतकार्य सुरू आहे. याशिवाय आता दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये भीषण दुर्घटना!, खासगी बसला आग लागून १ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची भीती
या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की “मी आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी माझी चर्चा झाली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी देखील मी बोललो आहे. जवळपास ११ जणांचा मृत्यू आहे आणि ३८ जण जखमी आहेत, त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. खासगी रुग्णालयांची मदत घेण्याच्याही सूचना मी दिलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीत जखमींना योग्य उपचार मिळाले पाहिजेत. त्यानुसार महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक घटनास्थळी आहेत. त्यांना देखरेख करण्यास सांगितलं आहे. कोणालाही उपचारामध्ये काही कमी पडू नये अशाप्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत.”
नक्की पाहा >> Nashik Bus Fire Accident: ११ जणांचा जागीच कोळसा झाला; मृतांमध्ये आई आणि बाळाचाही समावेश; पाहा थरकाप उडवणारे फोटो
याशिवाय “सर्व बाबी तपासल्या जातील, त्याची चौकशी केली जाईल. परंतु सध्या जे जखमी आहेत, त्यांना मदत करण्यास प्राधान्य देण्याच्यी मी सूचना केलेली आहे. ही बस यवतमाळहून मुंबईच्या दिशेने निघाली होती. ती एका ट्रकला धडकल्याने आग लागली. जखमींवर उपचारांसाठी सचूना केल्या आहेत, दोन-तीन जणांना खासगी रुग्णालयातही दाखल केलेलं आहे. जखमींवरील उपचार पूर्णपणे शासनाकडून केला जाईल आणि ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत शासनाकडून दिली जाईल.” अशी माहितीही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
“यवतमाळकडून आलेली प्रवासी बस आणि अमृतधामकडून येणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. यानंतर बसने पेट घेतला. बस इंजिन फुटलं होतं आणि डिझेलने पेट घेतला होता. पूर्ण बस जळू लागली, मागील बाजूने लोक आपला जीव वाचवण्यासाठी उतरत होते. पेटलेल्या अवस्थेत मिळेल त्या दिशेने सैरभैर पळत होते. रस्त्यावर काहीजणांचा पूर्णपणे कोळसा झाला.” असं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं आहे.