नाशिक : लोखंडी सळयांची धोकादायकपणे वाहतूक करुन अपघातास कारणीभूत ठरल्याने टेम्पो चालक, मालक आणि सळईंचा पुरवठादार अशा तीन जणांविरुध्द भद्रकाली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना अटक झाली असून चालक फरार आहे.
शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर रविवारी रात्री लोखंडी सळया भरलेला टेम्पो थांबलेला होता. त्यावर दुसरे मालवाहू वाहन धडकल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. तर १३ जण जखमी झाले. टेम्पोतून बाहेर आलेल्या सळया मालवाहू वाहनात शिरल्या. सोमवारी सकाळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागाची बैठक घेऊन वाहतूक नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाजन यांनी त्रुटींवर बोट ठेवले. उड्डाण पुलावर नादुरुस्त झालेल्या टेम्पोच्या मागील बाजूकडून १० फूट सळया बाहेर आल्या होत्या. रेडिअम किंवा लाल कापडही लावलेले नव्हते. रात्रीच्या वेळी सळई दिसत नाही. त्यामुळे अपघात होतात. चालकासह टेम्पो मालक, सळईंचा पुरवठादार या सर्वांची सुरक्षित वाहतुकीची जबाबदारी होती. या सर्वांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात ट्रॅक्टर ट्रॉलीसह अनेक वाहनांवर मागील बाजूला रेडिअम लावले जात नाही. ही वाहने रस्त्यावर उभी केल्याने आजवर अनेक अपघात झाले आहेत. भाजपकडून आता सर्व बाजार समित्यांमध्ये ट्रॅक्टरला रेडिअम लावण्याची मोहीम हाती घेतली जाईल, असे महाजन यांनी नमूद केले.
हेही वाचा…निर्यात शुल्कविरोधात कांदा उत्पादक आक्रमक, लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले
दरम्यान, अपघातानंतर फरार झालेला टेम्पो चालक समीर शहा, मालक अशोककुमार यादव (४१, अंबड) आणि सळई विक्रेता मनोजकुमार धिमाण (५४) यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील यादव आणि धिमाणला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत
अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल. जखमींच्या औषधोपचाराचा खर्च शासनाकडून केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याची माहिती यावेळी देण्यात आली.