नाशिक – ५० कोटींच्या कर्जासाठी ४० लाखांचा खर्च, प्रदीर्घ काळापासून एकाच लेखा परीक्षकाची संशयास्पद नियुक्ती आदी विषयावरून रविवारी मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला. अखेर नवीन लेखा परीक्षक नियुक्तीचे सर्वाधिकार सरचिटणीसांना देण्यात आले.
मविप्र संस्थेच्या कै. तुकारामजी रौंदळ सभागृहात संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली ११० वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार अनुपस्थित होत्या. यावेळी ॲड. संतोष गायकवाड यांनी संस्थेसाठी ५० कोटी रुपयांचे कर्ज घेताना ७५ लाख रुपये खर्च करण्यात आल्याकडे लक्ष वेधले. यावर सरचिटणीस ठाकरे यांनी वित्तीय संस्थेने तितक्या रकमेची मागणी केली होती. परंतु, तत्कालीन सरचिटणीस व कार्यकारिणी सदस्यांनी वाटाघाटी करून ४० लाख रुपये शुल्क निश्चित केल्याचे उत्तर दिले. मविप्र संस्थेच्या लेखापरीक्षणाचे काम प्रदीर्घ काळापासून बस्ते ॲण्ड बस्ते ही कंपनी करीत असल्याकडे काहींनी लक्ष वेधले. संबंधिताच्या कार्यशैलीवर काहींनी साशंकता व्यक्त केली. यावर वादळी चर्चा होऊन अखेर नवीन लेखा परीक्षक नियुक्तीचे सर्वाधिकार सरचिटणीसांना देण्याचा निर्णय घेतला गेला. सर्वसाधारण सभेने हा निर्णय घेतल्याने आम्ही लेखा परीक्षकाची नेमणूक करू, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा – नंदुरबार तालुक्यात दोन भावांचा बुडून मृत्यू
चाचडगाव येथे कृषी महाविद्यालयासाठी इमारत बांधणीवर मोठा खर्च केला गेला. परंतु ,तिथे विद्यार्थी जाण्यास तयार नाहीत. संस्थेतील काही महाविद्यालयांना स्वायत्त दर्जा मिळविण्यासाठी तयारी चालविली आहे. त्यास एका सभासदाने विरोध केला. सरचिटणीस ठाकरे यांनी मविप्रच्या कार्यकारी मंडळाने गेल्या दोन वर्षात संस्थेच्या ठेवी सव्वाशे कोटींपर्यंत नेल्याचे सांगितले. या काळात ३८ कोटी ३५ लाख कर्जपरतफेड करण्यात आली. विनाअनुदानित तत्वावरील सेवकांना चालू वर्षात ३० कोटी रुपयांची पगारवाढ देण्यात आली. एक कोटी ९३ लाख रुपये संस्थेच्या विविध शाखांतील इमारतींच्या बांधकामावर खर्च केले. या पद्धतीने संस्थेची वाटचाल प्रगतीपथावर असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले. मविप्र संस्थेचे २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक एक हजार ८७ कोटी ५८ लाखांचे आहे.
हेही वाचा – नाशिक : पार नदीच्या पुरात वाहून युवकाचा मृत्यू
मविप्र संस्थेने पुढील काळात मविप्र स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठाचा संकल्प केला आहे. कन्व्हेन्शन सेंटर, होमिओपॅथी महाविद्यालय, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान, आयुर्वेद व दंतवैद्यक महाविद्यालय, पशुवैद्यक महाविद्यालय, सैनिकी शाळा, कौशल्य विकास विद्यापीठ, बी.एस्सी एव्हिएशन अभ्यासक्रमाची आखणी केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.