नाशिक : सोन्याचे दागिने ठेवल्यास व्याजापोटी आठ टक्के वाढीव सोने देण्याचे आमिष दाखवत दीड किलोहून अधिक सोन्याचा अपहार करून गायब झालेल्या सराफाला शहर पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ही कारवाई केली.
सतीश बेदमुथा उर्फ मुथा (५९ , जयदीप सोसायटी, सहकारनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शहरातील एका महिलेने याबाबत तक्रार दिली होती. संशयिताचे मेसर्स कांतीलाल सुगनचंद सराफ नावाचे दुकान आहे. या दुकानात २०१४ पासून महिलेचे जाणे-येणे होते. पिढीजात सराफ असल्याने महिलेचे कुटूंबिय विश्वासाने संशयिताच्या दुकानात खरेदीसाठी जात होते. महिलेकडून दोन, चार महिन्यात सोने खरेदी होत असल्याने संशयिताने आमिष दाखवत फसवणूक केली. तुमच्याकडील सोने वा सोन्याचे दागिने दुकानात ठेवल्यास व्याजापोटी आठ टक्के वाढीव सोने देण्याचे आमिष दाखवित त्याने महिलेसह तिच्या आईला भुरळ पाडली.
त्यामुळे विश्वासाने त्यांनी दीड किलोहून अधिक वजनाचे दागिने संशयिताच्या स्वाधिन केले. मात्र नंतर संशयित गायब झाला. या प्रकरणी मार्च महिन्यात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस संशयिताच्या मागावर होते. युनिट एकचे उपनिरीक्षक रवींद्र बागूल यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली. संशयित सराफ पुण्यातील सहकारनगर भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने धाव घेत त्यास ताब्यात घेतले. संशयित बेदमुथाला सरकारवाडा पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रवींद्र बागूल, संदीप भांड, विशाल काठे,पोलीस नाईक विशाल देवरे, हवालदार धनंजय शिंदे अंमलदार जगेश्वर बोरसे, चालक सुक्राम पवार आदींच्या पथकाने केली.
पूर्ववैमनस्यातून गॅरेजमधील दुचाकींची जाळपोळ
नांदूर नाका भागात समाजकंटकाने खोडसाळपणे गॅरेजमधील सात दुचाकी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याचा प्रकार उघड झाला. यात दुचाकींचे मोठे नुकसान झाले. स्थानिकांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत मिलिंद म्हस्के (मखमलाबाद नाका) यांनी तक्रार दिली. प्रेम खलसे (श्रीमंतयोगी सोसायटी, आडगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. म्हस्के यांचे जत्रा हॉटेल-नांदूरनाका मार्गावर मातोश्री ऑटोमोबाईल नावाचे दुचाकी वाहनांचे गॅरेज व सुट्या भाग विक्रीचे दुकान आहे. गुरूवारी मध्यरात्री संशयिताने पूर्ववैमनस्यातून दुरूस्तीसाठी गॅरेजमध्ये लावलेल्या दुचाकी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्या. या घटनेत सात दुचाकींचे नुकसान झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. दुचाकी पेटल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणारे दोन अड्डे उद्ध्वस्त
घरगुती गॅस वाहनांमध्ये भरून देणारे खडकाळी आणि श्रमिकनगर येथील दोन अड्डे शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक व युनिट दोनच्या पथकांनी उद्ध्वस्त केले. या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली असून दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
खडकाळी सिग्नल भागात पैसे घेऊन घरगुती सिलिंडरमधून वाहनांना गॅस भरून दिला जात असल्याची माहिती युनिट एकच्या पथकास मिळाली होती. त्याआधारे गुरूवारी सायंकाळी पथकाने छापा टाकला. मोकळ्या मैदानातील पत्र्याच्या शेडमध्ये एजाज चांद शेख (२३, नाईकवाडीपुरा, भद्रकाली ) हा घरगुती सिलिंडरमधून रिकाम्या गॅस सिलिंडरमध्ये यंत्राच्या सहाय्याने गॅस भरतांना आढळला. संशयितास ताब्यात घेत पथकाने सहा भरलेले आणि चार रिकामे सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटार असलेले यंत्र, वजन काटा असा सुमारे ४६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत अंमलदार आप्पा पानवळ यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई श्रमिकनगर भागात करण्यात आली. पार्थ हॉटेलमागील नाल्याजवळ गॅस भरून देण्याचा अड्डा सुरू असल्याची माहिती युनिट दोनच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी पथकाने माळी कॉलनी भागात छापा टाकला. रामेश्वर नागरे यांच्या जागेतील पत्र्याच्या शेडमध्ये संजय शेळके (५४, नागरे चौक, श्रमिकनगर), छोटू शिरसाठ (३९, श्रमिकनगर) हे दोघे घरगुती सिलिंडरमधील गॅस बेकायदा खासगी वाहनात भरतांना आढळले. संशयितांच्या ताब्यातून गॅस भरण्याच्या यंत्रासह सिलिंडर व रोकड असा सुमारे एक लाख आठ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या बाबत हवालदार संजय सानप यांनी दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.