गुरुवारी गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे होणारी गर्दी पाहता शहरातील काही भागात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून शहर पोलिसांच्या वतीने वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.शहरातील सार्वजनिक श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीला वाकडी बारवपासून सुरुवात होईल. चौकमंडई, जहांगीर मशिद, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, बादशाही लॉज कॉर्नर, विजयानंद थिएटर , गाडगे महाराज पुतळा, गो. ह. देशपांडे पथमार्गे मिरवणूक म्हसोबा पटांगणावर पोहचेल. सकाळी १० वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत मिरवणूक मार्ग इतर वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या तपोवन, निमाणी तसेच पंचवटी कारंजा येथून सुटणारी सिटीलिंक शहर बससेवा पंचवटी डेपोमधून सुटेल. ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणारी बससेवा तसेच इतर वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारका चौकाकडून नाशिकरोड, नाशिक शहर व इतरत्र जातील. तसेच पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका चौक, कन्नमवार पूलमार्गे जातील. रविवार कारंजा, अशोकस्तंभ येथून सुटणारी शहर बससेवा शालिमार येथून सुटेल.
हेही वाचा >>> धुळ्यात विसर्जन मिरवणुकीवर सातशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील आनंदवली परिसरातही नदीपात्रात विसर्जन केले जात असल्याने चांदशी गाव ते आनंदवली नदीपात्र यामार्गे ये-जा करणारी वाहतूक आनंदवली पुलाकडे न जाता चांदशी गाव रस्त्याने नाशिक तट कालव्यापासून उजव्या बाजूने वळून मखमलाबादरोडलगत रामवाडीमार्ग अशोकस्तंभ ते गंगापूररोड असे जातील. त्याच मार्गाने येतील. या बदलाची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिकरोड विभागातही वाहतूकीत बदल
नाशिकरोड परिसरातील विसर्जन मिरवणूक बिटको चौक, शिवाजी महाराज पुतळा, देवी चौक, रेल्वे स्थानक पोलीस चौकी, सुभाष रोड, देवळाली गाव, गांधी पुतळा, खोडदे किराणा दुकानमार्गे देवळाली गावापर्यंत काढण्यात येणार आहे. या मार्गावर वाहतूक बंद राहणार आहे. पंचवटी एस.टी.डेपो क्रमांक दोन, निमाणी स्थानक, तपोवन, महामार्ग, सिडको आदी विभागातून नाशिकरोड रेल्वे स्थानकाकडे जाणारी शहर बससेवा तसेच राज्य परिवहनची बससेवा दत्त मंदिर सिग्नलपर्यंत जातील. तेथून परत येतील. तसेच सिन्नर कडे जाणारी राज्य परिवहन मंडळाची बससेवा आणि इतर वाहने उड्डाणपुलावरून जा-ये करतील. देवळाली कॅम्प परिसरात मिरवणूक ही नाशिकरोड- देवळाली कॅम्प या मार्गावरील सिलेक्शन कॉर्नर, झेंडा चौक, शारदा हॉटेल, जामा मशिदरोड, जुने बस स्थानक, संसरी नाका, संसरीगावमार्गे दारणा नदीपर्यंत निघते. हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.