नाशिक : नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक बसेस आणि ॲपमध्ये मदतीची गरज असणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी आपत्कालीन बटणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. काही दिवसांपासून विनाकारण प्रवाशांकडून हे बटण दाबले जात असल्याने चालक, वाहकांसह संबंधित कर्मचाऱ्यांना नाहक त्रास करावा लागत आहे. त्यास चाप लावण्यासाठी आता विनाकारण आपत्कालीन बटण दाबणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.

शहरासह शहराच्या हद्दीपासून २० किलोमीटर परिघात सिटीलिंक प्रशासन सुमारे २०० हून अधिक बसेसद्वारे सेवा देत आहे. दररोज हजारो नागरिक या बससेवेचा वापर करतात. सिटीलिंकमधून प्रवास करताना प्रवाशाला काही गंभीर अडचण भासल्यास तत्काळ मदत मिळावी म्हणून बसमध्ये आणि नाशिक सिटी बस ॲपमध्ये आपत्कालीन बटणाची सुविधा दिली आहे. परंतु, त्याचा अधिक्याने गैरवापर होत असल्याचे प्रशासनाला दिसत आहे.

दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी व गरजुंना वेळीच मदत मिळावी, याकरिता बसमधील तसेच नाशिक सिटी बस ॲपमधील आपतकालीन बटण विनाकारण दाबू नये. केवळ मदत आवश्यक असल्यास हे बटन दाबावे, असे आवाहन सिटीलिंक प्रशासनाने केले आहे.