नाशिक – तीन महिन्यांपासून वेतन थकीत असल्याची तक्रार करत नाशिक महानगरपालिकेच्या सिटीलिंक बसच्या वाहकांनी पुन्हा एकदा काम बंदचे हत्यार उपसल्याने गुरुवारी बससेवा ठप्प झाली. परीक्षा काळात बससेवा बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
सिटीलिंक बस सेवेत सुमारे ५०० वाहक कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. वाहक पुरविण्याचा ठेका ज्या राजकीय ठेकेदाराला दिला गेला आहे, त्याच्याकडून संबंधितांना वेळेवर वेतन दिले जात नाही आणि प्रवासी वेठीस धरले जातात, असे वारंवार उघड झाले आहे. या कारणास्तव एक, दीड वर्षात वारंवार बससेवा बंद पडूनही मनपा प्रशासन ठेकेदारासमोर हतबल ठरल्याचे दिसून आले. गुरुवारी पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाली.
तपोवन आगारातील वाहकांनी वेतन न मिळाल्याच्या निषेधार्थ सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले. आगाराबाहेर बस बाहेर काढण्यास प्रतिबंध केला. परिणामी, तपोवन आगारातून सुमारे १५० बसगाड्या बाहेर पडू शकल्या नाहीत. नाशिकरोड आगारातून १०० बस कार्यरत असतात. या आगारातून प्रवासी वाहतूक सुरळीत असल्याचा दावा सिटीलिंक प्रशासनाने केला. वाहकांच्या वेतनाचे पैसे सिटीलिंक प्रशासनाने ठेकेदाराला आधीच दिले आहेत. त्याच्याकडून सर्व वाहकांना त्याचे वाटप झाले नसल्याने हा पेच निर्माण झाला. आंदोलक वाहकांना तातडीने वेतन देण्याची सूचना ठेकेदाराला करण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
हेही वाचा – गुटखा तस्कर इसरार मन्सुरी यास पोलीस कोठडी
हेही वाचा – नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पाऊस, गारपीट
महानगरपालिकेच्या सिटीलिंक बससेवेला ठेकेदारांच्या कार्यशैलीने ग्रहण लागले आहे. या सेवेतून दररोज हजारो विद्यार्थी व नागरिक प्रवास करतात. परीक्षा काळात बससेवा बंद राहिल्याचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागला. रिक्षाचालकांनी मनमानीपणे भाडे आकारणी करुन प्रवाश्यांची लुबाडणूक केली. ठेकेदार-वाहकांमधील वादात प्रवासी भरडले जात आहेत. बससेवा सुरळीत करण्यासाठी ठेकेदाराशी बोलणे सुरू असल्याचे सिटीलिंक प्रशासनाने म्हटले आहे.