नाशिक : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानातंर्गत येथे आयोजित महामेळाव्यात सहभागी झालेल्या ५० हजार लाडक्या बहिणींच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन आणि नाशिक परिवहन महामंडळाच्या (सिटीलिंक) ९०० बसेसचा वापर झाल्यामुळे सिटीलिंकची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली. तशीच स्थिती कमी-अधिक प्रमाणात राज्य परिवहनच्या प्रवासी वाहतुकीची होती. शहरातील बस थांब्यावर विद्यार्थी, प्रवासी बराच काळ तिष्ठत राहिले. सिटीलिंकच्या २२०० फेऱ्या कमी झाल्यामुळे ही स्थिती उद्भवल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंचवटीतील तपोवन मैदानात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून ५० हजार लाडक्या बहिणींना सहभागी करण्यात आले. तालुकानिहाय बहिणींच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहनच्या ७०० आणि शहरातील बहिणींसाठी नाशिक परिवहन महामंडळाच्या (सिटीलिंक) २०० अशा एकूण ९०० बसेसचा वापर झाला. राज्य परिवहनने नाशिकमधून २५०, शेजारील अहमदनगर, धुळे, जळगाव जिल्ह्यातून उर्वरित ४५० बसेस मागविल्या होत्या. त्यामुळे नाशिक शहर व ग्रामीण भागाप्रमाणे उपरोक्त जिल्ह्यात शुक्रवारी बसची कमतरता जाणवली. अनेक मार्गांवरील फेऱ्या कमी कराव्या लागल्या. प्रवाशांना त्रास होणार नाही, अशा पध्दतीने नियोजन केल्याचे सांगितले गेले असले तरी प्रत्यक्षात जिल्ह्यांतर्गत व लांब पल्ल्याच्या बसेसची कमतरता जाणवत होती.

हेही वाचा…भावना व्यक्त करणाऱ्यांना नजरकैद, नाना पटोले यांची महायुती सरकारवर टीका

शहर, परिसरातील सिटीलिंकची वाहतूक पूर्णपणे कोलमडली. नाशिक मनपा परिवहन महामंडळ अर्थात सिटीलिंकच्या ताफ्यात एकूण २५० बस आहेत. त्याद्वारे दैनंदिन २६०० फेऱ्यांमधून एक लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. यातील २०० बस लाडक्या बहिणींच्या वाहतुकीसाठी उपलब्ध केल्यामुळे सुमारे २२०० फेऱ्यांची कपात झाली. या दिवशी केवळ ५० बसद्वारे प्रवासी वाहतूक झाली. विद्यार्थी व नागरिकांचे हाल झाले. थांब्यावर प्रवासी ताटकळत राहिले. अनेकांना रिक्षाशिवाय पर्याय राहिला नाही. सिटीलिंकचे २६ हजार प्रवासी असून त्यांनाही मेळाव्याचा फटका बसला. मेळाव्यातील महिलांना पुन्हा घरी सोडण्यासाठी याच बसचा वापर झाला. परिणामी सिटीलिंकची सेवा पूर्ण क्षमतेने रात्री उशिराही पूर्ववत होणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ६४ बसेस नंतर थेट मुक्कामी जातील. असेही सांगण्यात आले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik citylink services disrupted due to ladki bahin programme transport passengers stranded psg