नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात प्रयागराजप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली तर काय करणार…पोलीस गर्दीचे नियोजन कसे करतात…पोलीस लाठीमार का करतात, यासह वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती विद्यार्थ्यांकडून पोलीस आयुक्तांवर करण्यात आली. निमित्त होते पोलीस आयुक्तालय कामकाज पाहणीचे.
येथील पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून शहरातील नागरिकांना पोलीस आयुक्त कार्यालयाची माहिती व्हावी, कार्यालयात चालणारे कामकाज प्रत्यक्ष पाहता यावे, यासाठी पोलीस आयुक्त कार्यालय पाहणी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत मंगळवारी आयएमआरटी महाविद्यालयातील पदव्युत्तर व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तालयातील विविध कक्षातील कामकाजाची पाहणी केली. आयुक्तालयातील प्रशिक्षण विभाग, विशेष शाखा, कुंभमेळा कक्ष, डायल ११२, नियंत्रण कक्ष, शीघ्र कृती दल, पारपत्र आदी विभागाच्या कामकाजाची पाहणी केली. कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांना पोलीस दलाच्या कामकाजाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी कुंभमेळ्यात गर्दीचे नियोजन कसे करणार, असा प्रश्न विचारला. कुंभमेळ्यासाठी कोट्यवधी भाविक येतील. ते नाशिकमध्ये कुठे राहतील, नाशिकपर्यंत कसे येतील, यासह वेगवेगळ्या मुद्यांच्या आधारे नियोजन करतांना भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त कसा राहील, असे प्रश्न करण्यात आले.
एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांच्या सुरक्षेसह स्वत:चा जीव वाचविणे महत्वाचे असते. तुमच्यावर जर दगड येत असेल तर तुम्हाला बचाव करण्यासाठी लाठीमार करावा लागतो. आगामी कुंभमेळ्यात विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य वापरत विविध जबाबदाऱ्या पार पाडता येणार आहेत. यादृष्टीने काय करता येईल, त्याचा विचार करा, अशी सूचना पोलीस आयुक्त कर्णिक यांनी केली. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आवश्यक प्रशिक्षण देण्यात येईल, असेही कर्णिक यांनी नमूद केले.
दरम्यान, पोलीस दलाविषयी चित्रपट पाहून तयार झालेली प्रतिमा आणि प्रत्यक्षात पोलिसांचे कामकाज, खाकी वर्दीआड दडलेला माणुस या भेटीत विद्यार्थ्यांनी अनुभवला. पोलिसांविषयी असणारी भीती कमी व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांना बोलते करण्याचा प्रयत्न करत तुमच्या अडचणींविषयी दिलखुलास बोला, असे आवाहन सातत्याने करण्यात येत होते.
महापालिका आयुक्त मनिषा खत्री याही यावेळी उपस्थित होत्या. त्यांनी एखादा प्रकल्प ठरविताना त्याचे महत्व, नागरिकांना अधिकाधिक काय देता येईल, कोणाचे वैयक्तिक स्वारस्य आहे काय, अशा वेगवेगळ्या मुद्यांचा विचार करुन एखादा प्रकल्प ठरतो. मग त्यातील अडथळे दूर केले जातात. त्यानंतर तो प्रकल्प अंतिम स्वरूपात येतो, असे आयुक्त खत्री यांनी सांगितले.
पोलिसांविषयीची भीती कमी व्हावी, नागरिकांनी काही सूचना कराव्यात, आयुक्तालयात कसे कामकाज चालते, त्याची माहिती व्हावी, यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून पोलीस आयुक्त कार्यालय पाहणी उपक्रम सुरू करण्यात आला आहे.