नाशिक : महाविकास आघाडीतील जागा वाटपात शहरातील चारपैकी एकही मतदारसंघ काँग्रेसला न मिळाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी गुरुवारी शहरातील पक्ष कार्यालयास टाळे ठोकून नेते आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांचा निषेध केला. नाशिक मध्यची जागा शिवसेनेला (उद्धव ठाकरे) सोडल्याने इच्छुक डॉ. हेमलता पाटील यांनी मैत्रीपूर्ण लढत अथवा अपक्ष मैदानात उतरण्याचे निश्चित केले आहे. शहरात एकही जागा न मिळाल्यास पक्षाचे अस्तित्व लुप्त होईल. त्यामुळे हक्काच्या जागांबाबत पुनर्विचार करावा अथवा मैत्रीपूर्ण लढतीस परवानगी द्यावी, या मागणीसाठी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी थेट दिल्लीत धाव घेतली.
महाविकास आघाडीत ज्या जागांवर सहमती झाली, यातील आपल्या काही उमेदवारांची नावे ठाकरे गटाने बुधवारी जाहीर केली होती. यात नाशिक जिल्ह्यातील पाच जागांचा समावेश असून त्यात शहरातील नाशिक मध्य आणि नाशिक पश्चिम या दोन आहेत. नाशिक पूर्व आणि देवळालीची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला जाण्याची चिन्हे असल्याने काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता आहे. शहरात एकही जागा काँग्रेसला मिळणार नसल्याची पदाधिकाऱ्यांची भावना आहे. त्यातून उद्रेक होऊन कार्यकर्ते व पदाधिकारी पक्षाचे नेते व प्रदेश पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करीत आहेत. गुरुवारी काँग्रेसचे सुरेश मारू, काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर, उद्धव पवार, विजू पाटील, कैलास कडलक, वंदना पाटील, जयेश पोकळे आदींनी महात्मा गांधी रस्त्यावरील काँग्रेस भवन या कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन केले. काँग्रेसला जागा मिळावी म्हणून पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
हेही वाचा…भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील आता मनसेचे उमेदवार
नाशिक मध्य मतदारसंघातून तयारी करणाऱ्या डॉ. हेमलता पाटील या निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. मैत्रीपूर्ण लढत अथवा अपक्ष म्हणून आपण उमेदवारी करणार असल्याचे त्यांनी सूचित केले आहे. उमेदवारीसाठी इच्छुक अन्य पदाधिकाऱ्यांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे. जागा वाटपात काँग्रेसवर अन्याय होत असल्याने शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी गुरुवारी दिल्ली गाठली. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन जागा वाटपाचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात येणार आहे. या घटनाक्रमात पक्षाचे नाशिक प्रभारी परेश धनानी हे शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्यासमोर आपली भावना मांडण्याची तयारी इच्छुकांनी केली आहे.
हेही वाचा…मालेगाव तालुक्यात चार गावठी बंदुकांसह ३१ जिवंत काडतुसे ताब्यात
…तर शहरातून काँग्रेस लुप्त
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने शहरात विधानसभा लढविणे आवश्यक आहे. पक्षचिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळेल. विधानसभेची एकही जागा न मिळाल्यास भविष्यात अधिक अडचणी निर्माण होतील, याकडे लक्ष वेधत स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुक नाशिक मध्य या जागेवर पुनर्विचार करण्यासाठी आग्रही आहेत. एकतर ही जागा काँग्रेसला द्यावी, अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीला परवानगी देण्याची मागणी वरिष्ठांकडे केली जात आहे.