गर्दी जमविण्यासाठी पालिकेची  धडपड

केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समाविष्ट झालेल्या नाशिकला स्मार्ट करण्याच्या संकल्पनांवर मंथन करण्यासाठी आयोजिलेल्या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राकडे नगरसेवकांनी पाठ फिरविली तर दुसऱ्या सत्रात गर्दी जमविण्यासाठीच पालिकेतील मुखंडांना धडपड करावी लागली. दोन्ही सत्रात सादरीकरण झाले. मात्र, अभिप्रेत चर्चाच होऊ शकली नाही. नगरसेवकांसाठीच्या सत्रात हा विषय सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यास सांगण्यात आले. सर्वसामान्यांसाठीच्या सत्रात पालिका आयुक्तांनी जगभरातील नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे दाखले देत आपणास काय करता येईल अशी विचारणा केली. मात्र, ते किती जणांच्या पचनी पडले आणि कितपत चर्चा झाली, हा विषय अनुत्तरीतच राहिला.

महाकवी कालिदास कला मंदिरात महापालिकेच्यावतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा अहवाल दोन सत्रात नगरसेवक आणि शहरवासीयांसमोर सादर करण्यात आला. यावेळी महापौर, उपमहापौर व विविध संस्थांचे प्रतिनिधी व नागरीक उपस्थित होते. नगरसेवकांसाठीच्या विशेष सत्राकडे अनेकांनी पाठ फिरविली. केवळ ३० नगरसेवक उपस्थित होते. यामुळे शहर स्मार्ट करण्यासाठी कोणाला किती उत्साह आहे हे देखील पहावयास मिळाले. आयुक्तांनी सादरीकरण केल्यावर उपस्थित नगरसेवकांनी हा विषय महासभेवर ठेवण्याची मागणी केली. दुपारच्या सत्रात जाहीर सभा असल्याप्रमाणे गर्दी जमविण्यात आली. आयुक्तांनी शहराचा सर्वागिण विकास आणि आवश्यक त्या योजनांची पूर्तता म्हणजे स्मार्ट सिटी असल्याचे नमूद केले. त्यासाठी नागरीक, लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी स्मार्ट होणे आवश्यक आहे. महापालिकेच्या आर्थिक स्त्रोतांच्या माध्यमातून शहराचा विकास योग्य पध्दतीने होतो की नाही, याचा विचार व्हायला हवा. सार्वजनिक वाहतुकीसाठी मोनो रेल, बससेवा, जलमार्ग व सार्वजनिक सायकल शेअरिंग हा महत्वाचा मुद्दा आहे. शहरवासीयांशी निगडीत विविध प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करता येईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. विविध देशात साकारलेल्या अनोख्या प्रकल्पांची माहिती त्यांनी दिली. त्या स्वरुपाचे काही प्रकल्प नाशिकमध्येही राबविता येऊ शकतात. यावर विचार होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकल्पाचे सादरीकरण सुरू असताना जमलेल्या गर्दीत काहिसे गोंधळाचे वातावरण होते. कोणी बाहेर उठून जात होते तर कोणाचे मध्येच आगमन होत होते. उपस्थितांमध्ये बचत गटातील महिलांची संख्या मोठी होती. या महिलांकडे विचारणा केली असता त्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पांमुळे महिलांना मोठय़ा प्रमाणात रोजगार मिळणार असल्याचे सांगण्यात आले. रोजगाराची उपलब्धता होईल, या आशेने पदरमोड करत तर कोणी उधार उसनवार करत सभागृह गाठले. मात्र, सादरीकरणातून त्यांनाही फारसे काही उमगले नाही.

शहराला स्मार्ट करण्याच्या प्रयत्नात पालिकेची कार्यशैली वेगळी ठरली. नियोजित प्रकल्पांविषयी चर्चा होणे अभिप्रेत होते. तथापि, उपस्थितांमध्ये भलतेच सहभागी झाल्याने काही नवीन संकल्पना अथवा मांडलेल्या संकल्पनांवर काही मंथन झाले नाही.

 

Story img Loader