नाशिक – भ्रमणध्वनी चोरी करणाऱ्या आंध्र प्रदेश आणि तामिळनाडु येथील आंतरराज्य टोळीकडून २२ भ्रमणध्वनी नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखा एकने ताब्यात घेतले आहेत. शहर परिसरात वारंवार रहिवासी वस्ती, बाजारपेठांमधून नागरिकांचे भ्रमणध्वनी चोरीच्या घटना घडत असल्याने चोरट्यांच्या शोधासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलिसांना सूचना केल्या होत्या.
हेही वाचा >>> नाशिक : कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने गंडा, संशयितास आठ दिवसांची कोठडी
पंचवटी परिसरातून एकाच दिवशी पाच भ्रमणध्वनी चोरीस गेल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करत असतांना स्थानिक गुन्हे शाखा एकला आंध्र प्रदेश आणि तामिळनाडु येथील भ्रमणध्वनी आणि लॅपटॉप चोरी करणारी टोळी नाशिक शहरात आली असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या वतीने सापळा रचत इंद्रा डुमप्पा, दुर्गेश कृष्णमूर्ती (रा. आंध्र प्रदेश), बालाजी सुब्रमणी (रा. तामिळनाडु) यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून अंदाजे दोन लाख, ३८ हजार २०० रुपयांचे २२ भ्रमणध्वनी जप्त केले. संशयितांना पंचवटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.