Nashik Ravivar Karanja Ganesh Mandir : नाशिकमधल्या रविवार कारंजा भागात असलेलं चांदीच्या गणपतीचं मंदिर हे सिद्धिविनायक मंदिर म्हणून ओळखलं जातं. या मंदिरात चोरी झाली आहे. सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात फटका मारून गणपतीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. नाशिक शहरातल्या हजारो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजे हे चांदीच्या गणपतीचं सिद्धिविनायक मंदिर. या मंदिरात गणपतीची चांदीची मूर्ती आहे. या मूर्तीच्या गळ्यातले दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. या प्रकारामुळे सगळ्याच नाशिककरांना धक्का बसला आहे. घटना स्थळी पोलीस दाखल झाले आहेत. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या चोरीनंतर आता मंदिराच्या मालमत्तेचा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून मंगळसूत्र आणि सोनसाखळी चोरीच्या घटना तसंच घरफोडीच्या घटना घडत आहेत. तर दरोड्याच्याही घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडल्या आहेत. कायम गजबज असलेल्या नाशिकच्या रविवार कारंजा या भागात असलेल्या चांदीच्या गणपतीच्या मंदिरातून मूर्तीवरचे दागिने चोरीला गेले आहेत.
सीसीटीव्हीत प्रकार कैद, चोरटा अटकेत
चांदीच्या गणपतीच्या मंदिरात चोरी झाल्याचा हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गस्त घालणाऱ्या पोलिसांना या संदर्भातली माहिती मिळाली. त्यांनी चोराचा पाठलाग केला. चोरट्याने त्यावेळी गंगावाडी भागातून गोदावरी नदीत उडी मारली आणि पळ काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र स्थानिक नागरिकांच्या मदतीने चोराला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. निहाल यादव असं चोरट्याचं नाव आहे तो मूळचा मध्य प्रदेशचा आहे अशीही माहिती समोर आली आहे.
रविवारी पहाटे नेमकी काय घडली घटना?
सिद्धिविनायक चांदीच्या गणपतीच्या मंदिरात पहाटे एका चोराने प्रवेश केला. गणपतीच्या दागिन्यांची चोरी करून तो चोर मंदिरात शिरला. सुरक्षारक्षकाने हा सगळा प्रकार पाहिला तेव्हा तो चोराला अडवण्यासाठी आला. त्यानंतर चोरट्याने सुरक्षारक्षकाच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याला जखमी केलं आणि पळ काढला. या चोरट्याने ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने पळवले होते. त्याला आता अटक करण्यात आली आहे.