नाशिक : प्रयागराज येथील कुंभमेळा मोकळ्या, विस्तीर्ण गंगा काठावर होतो. तर नाशिक-त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा दाटीवाटीच्या वस्तीने वेढलेल्या गोदा काठावर भरतो. २००४ मधील सिंहस्थात नाशिकमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या रमणी आयोगाने तयार केलेल्या अहवालाच्या आधारे आगामी कुंभमेळ्यात गर्दी व्यवस्थापनाचे आव्हान पेलण्याची तयारी केली जात आहे.

जिल्ह्याचे पालक सचिव तथा ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली येथे झालेल्या आढावा बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. २००४ मधील कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत २९ भाविकांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या रमणी आयोगाने भविष्यात अशी दुर्घटना रोखण्यासाठी विविध उपाय सुचवले होते. या अहवालाच्या आधारे काम करावे, असे बैठकीत सूचित करण्यात आले. प्रशासनाकडे रमणी आयोगाचा अहवाल आहे की नाही, याविषयी साशंकता व्यक्त होत असताना अहवाल उपलब्ध असल्याचे डवले यांनी नमूद केले. अहवालातील शिफारसींच्या आधारे २०१५ मधील कुंभमेळ्यात नियोजन झाल्याने तो निर्विघ्नपणे पार पडला होता, असा दाखला त्यांनी दिला.

नाशिक येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात शाही पर्वणीच्या दिवशी सुमारे ८० लाख तर, त्र्यंबकेश्वरमध्ये ३० लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. सरकारकडून कुंभमेळ्याचे मोठ्या प्रमाणात विपणन होईल. त्यामुळे आकड्यांच्या खेळात पडू नये. गर्दी वाढू शकते. प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून अधिकतम मोकळी जागा निर्माण करणे, सिंहस्थाची आवश्यक ती कामे प्राधान्याने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्दी व्यवस्थापनावर लक्ष केंद्रीत करण्याचे सूचित करण्यात आले.

‘कुशावर्त तीर्थ’ परिसर मोकळा करण्याची सूचना

त्र्यंबकेश्वरमध्ये गर्दीचे व्यवस्थापन आव्हानात्मक ठरते. कुंभमेळ्यात दाटीवाटीच्या भागातील कुशावर्त तीर्थावर मोठी गर्दी उसळते. त्र्यंबक नगरीत एकावेळी पाच लाख भाविकांची हाताळणी शक्य होते. पर्वणी काळात २५ ते ३० लाख भाविक येणार असल्यास त्यांना विशिष्ठ ठिकाणी टप्प्या टप्प्याने थांबवून पुढे मार्गस्थ करणे क्रमप्राप्त ठरेल, कुशावर्तचा परिसर मोकळा करून अधिकच्या जागेचे नियोजन करावे लागणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये शासकीय कार्यालये आहेत. सिंहस्थ काळासाठी ती स्थलांतरीत करण्याचा विचार प्रशासकीय यंत्रणेकडून होत आहे.

रमणी आयोगाच्या शिफारसी

२००४ मध्ये सिंहस्थात नाशिक येथे चेंगराचेंगरी झाल्यानंतर नेमण्यात आलेल्या रमणी आयोगाने काही शिफारसी सुचविल्या होत्या.

नाशिक शहरातील शाही मिरवणूक मार्गात बदल करण्यास आयोगाने सांगितले होते. त्यानुसार मागील कुंभमेळ्यात प्रशस्त असा नवीन शाही मार्ग तयार करण्यात आला. परंतु, साधू-महंतांनी त्या मार्गाने मिरवणूक नेली नाही.

चेंगराचेंगरीची दुर्घटना घडलेला सरदार चौक ते रामकुंड (गोदा काठ) उताराचा मार्ग एकेरी करणे.

साधू-महंतांच्या शाही स्नानानंंतर भाविकांना गोदा घाटावर टप्प्याटप्प्याने सोडणे.

मालेगाव स्टँडकडून रामकुंडाकडे येण्यास पूर्णत: प्रतिबंध. तीव्र उताराच्या या मार्गाचा रामकुंड परिसरातून बाहेर पडण्यासाठी वापर करणे, या महत्वाच्या शिफारसी होत्या.

Story img Loader