नाशिक – दिंडोरी तालुक्यातील भातोडे शिवारात टोमॅटो लागवड केलेल्या शेतात गांजाची संमिश्र शेती होत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी सुमारे ४२ लाख रुपये किंमतीची २०९ किलो ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त केली.
भातोडे येथील गट क्रमांक आठमध्ये रंगनाथ चव्हाण यांच्या टोमॅटोच्या शेतात सरीवर ठिकठिकाणी गांजाची झाडे लावली असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळाली होती. या आधारे वणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक गणेश कुटे यांच्यासह पोलीस पथकाने तिथे छापा टाकला. यावेळी टोमॅटोच्या शेतात गांजाची झाडे आढळून आली.
हेही वाचा – रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात मोहीम मेनरोड, शालिमार भागात कारवाई
पथकाने पंचनामा करीत ही झाडे मुळासकट उपटून जमा केली. खोड, पान, फांद्या, फूल व बांड असलेली साधारण पाच ते सहा फूट उंचीची गांजा सदृश्य झाडांचे वजन २०९.३२ किलोग्रॅम भरले. या झाडांची अंदाजित किमंत ४१ लाख ८६ हजार ४०० रुपये इतकी आहे. गांजासदृश्य झाडे लागवड केल्या प्रकरणी संशयीत रंगनाथ चव्हाण याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी भेट देऊन पहाणी केली.