नाशिक: आषाढी एकादशीनिमित्ताने नाशिक सायकलिस्टस् फाऊंडेशनच्यावतीने आयोजित पर्यावरणस्नेही सायकल वारीने शुक्रवारी सकाळी विठू माऊलीचा जयघोष करीत पंढरपूरकडे प्रस्थान केले. व्यसनमुक्त भारतचा संदेश घेऊन निघालेली सायकल वारी नाशिक ते पंढरपूर या ३५० किलोमीटरच्या अंतरात जनजागृती करणार आहे. वारीत ३०० सायकलपटू सहभागी झाले असून त्यामध्ये ४० महिलांसह एका अपंगाचाही समावेश आहे. संपूर्ण राज्यातील सायकलपटू सात जुलै रोजी पंढरपूरमध्ये एकत्र येणार असून त्यांचा सायकल रिंगण सोहळा होणार आहे.

यंदाचे सायकल वारीचे १२ वे वर्ष आहे. हुतात्मा अनंत कान्हेरै मैदानावर सकाळी सायकलपटू एकत्रित झाले. विठ्ठल आरती करण्यात आली. याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे सहसंचालक संजय बारकुंड आदी उपस्थित होते. फाऊंडेशनचे संस्थापक निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी हरीश बैजल यांनी मातोश्री लज्जावती बैजल यांच्या स्मरणार्थ पंढरपूर सायकल वारी सुरू केली आहे. प्रवासादरम्यान फाऊंडेशनचे पथक मार्गातील गावोगावी पथनाट्याद्वारे प्रबोधन करतील.

हेही वाचा : लेखनिकाशिवाय अंध विद्यार्थ्यांचे आता स्वलेखन, ॲपच्या मदतीने प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी राज्यात १६०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

वारीत खुल्या वाहनात निर्मिलेल्या रथात विठ्ठल मूर्ती आहे. सायकलपटूंबरोबर रुग्णवाहिका, वैद्यकीय पथकही आहे. वारीचे नियोजन अध्यक्ष किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, वारी प्रमुख उपाध्यक्ष अरुण पवार, डॉ. मनिषा रौंदळ, सचिव संजय पवार, संचालक दीपक भोसले हे करीत आहेत. पहिल्या दिवशी दीडशे किलोमीटरचे अंतर पार करून सायकलपटू अहमदनगर येथे मुक्काम करतील. मार्गात शाळांमध्ये जनजागृती केली आणि ठिकठिकाणी बिजारोपण केले जाणार असल्याचे अध्यक्ष काळे यांनी सांगितले.