बाळासाहेब वाकचौरे, भरत पन्नू यांची कामगिरी
पुणे ते गोवा या ६४६ किलोमीटरची ‘डेक्कन क्लिफहँगर’ सायकल स्पर्धा नाशिककर सायकलपटू बाळासाहेब वाकचौरे (२८ तास २६ मिनिटे) आणि लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू (२६ तास सहा मिनिटे) यांनी पूर्ण करून अमेरिकेतील रॅम स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठीची पात्रता पूर्ण केली आहे.
उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या बाळासाहेब वाकचौरे यांनी केवळ वर्षभरापूर्वी नाशिक सायकलिस्टचे सदस्यत्व स्वीकारून सहकाऱ्यांसोबत सायकल चालविण्यास सुरूवात केली. त्या बळावर त्यांनी डेक्कन क्लिफहँगर स्पर्धा थेट रॅमची पात्रता मिळवण्याच्या वेळेत पूर्ण करण्याची किमया साधली. त्यांना अॅड. दत्तात्रेय चकोर यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेसाठी त्यांना उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, चैतन्य वाकचौरे, रामेश्वर चांदोरे, सागर वाघमारे, कैलास कणखरे, गौरव चकोर, ओंकार जंगम या सदस्यांची साथ मिळाली. दर्शन दुबे यांनीही स्पर्धा पूर्ण केली, परंतु त्यांना रॅमसाठी पात्रता मिळवता आली नाही. अनिकेत झंवर यांनी ४०० किलोमीटर अंतर पूर्ण केल्यानंतर स्पर्धेतून माघार घेतली. कर्नल पन्नू यांनी सलग दुसऱ्या वर्षी स्पर्धा पूर्ण केली आहे.
पुढील वर्षी होणाऱ्या रॅम स्पर्धेत ते वैयक्तिक गटातून सहभाग घेणार आहेत. त्यामुळे आर्मीतील त्यांचे सहकारी लेफ्टनंट श्रीनिवास गोकुलनाथ यांच्यानंतर रॅम स्पर्धा एकटय़ाने पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यांना प्रमोद तुपे यांची सहयोगी सदस्य म्हणून साथ लाभली.
संगमनेरच्या विजय काळे, नीलेश वाकचौरे, अमोल कानवडे आणि शरद काळे-पाटील या चौकडीने ४० वर्षांवरील पुरुष गटात पहिल्या क्रमांकावर राहत २२ तास ४५ मिनिटात स्पर्धा पूर्ण केली. तसेच विजय ताजणे, डॉ. संजय विखे, प्रमोद देशमुख आणि विनायक पानसरे यांनी याच गटात २३ तास १५ मिनिटात स्पर्धा पूर्ण करताना तिसरे स्थान मिळविले.