नाशिक – सुरगाण्यात मंगळवारी झालेल्या वादळी पावसात अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तालुक्यातील बेहुडणे येथे वीज कोसळून गुराख्याचा मृत्यू झाला. नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
सुरगाण्यातील जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या आवारात असलेले २० वर्षांपूर्वीचे पिंपळाचे तसेच पोलीस ठाण्याजवळील भेंडीचे झाड मुळासकट उन्मळून पडले. पोलीस ठाण्याच्या गृहरक्षकांच्या खोलीवरील पत्रे जोरदार वादळामुळे हवेत उडून पोलीस परेड मैदानावरील वाहनतळ जागेत दोन गाड्यांवर पडल्याने त्यांचे नुकसान झाले. ठाणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रवीण निकुंभ यांच्या गाडीचे नुकसान झाले. पोलीस परेड मैदानावर सर्वत्र पत्रे पडलेले दिसून आले. गुरांच्या दवाखान्यासमोरील घराचे, बीएसएनएल मनोऱ्याजवळील घरावरील पत्रे उडाले. दुर्गादेवी मंदिराजवळील दिनेश मुसळे यांच्या घरावर भेंडीचे झाड पडल्याने घराचे पत्रे फुटले. यांसह यासह अनेक घरांचे पत्रे उडाल्याने नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने भात शेतीचे अतोनात नुकसान झाले असून कापणीला आलेला भात भुईसपाट झाला आहे. उंबरठाण, बाऱ्हे, पिंपळसोंड, रघतविहीर, राशा, बेहुडणे, म्हैसखडक या भागातही जोरदार पाऊस झाला.
हेही वाचा – मनोज जरांगे यांनी परिवर्तन महाशक्तीत यावे, संभाजीराजे भोसले यांची भूमिका
सुरगाणा तालुक्यातील बेहुडणे येथील मुरलीधर चौधरी (४४) हे गावाजवळील डोंगरावर गुरे चारण्यासाठी गेले असता त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांना उंबरठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सुरगाणा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.