आठ कोरडीठाक तर आठमध्ये जेमतेम साठा

एप्रिलच्या अखेरच्या टप्प्यात पाणीटंचाईचे संकट गहिरे झाले असून जिल्ह्यातील आठ धरणे कोरडीठाक पडली असताना आणखी आठ धरणे रिक्त होण्याच्या मार्गावर आहेत. रिक्त होणाऱ्या धरणांमधून ज्या ज्या भागास पाणीपुरवठा होतो, तिथे गाळमिश्रित गढूळ पाणी पिण्याची वेळ येणार आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाची वेगळी स्थिती नाही. मान्सूनचे नेहमीच्या वेळपत्रकानुसार आगमन न झाल्यास ग्रामीण भागातील टंचाईचे संकट भयावह स्वरूप धारण करू शकते.

Fish dead in Murbe Satpati Bay palghar news
मुरबे सातपाटी खाडीत हजारो मासे मृत; प्रदूषित पाण्यामुळे घटना घडल्याचे मच्छीमारांचे आरोप
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
Muddy and smelly water
मुंबई: पूर्व उपनगरात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी; भातसा पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, महापालिकेचा दावा
due to heavy rain in uran farmer losing their crops
परतीच्या पावसामुळे उरणमधील शेतीचे नुकसान, कृषी विभागाने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी
unusual summer rain and deluge in sahara desert change the fortunes of saharan countries
रखरखीत सहारा वाळवंटात ऐन उन्हाळ्यात मुसळधार पाऊस कसा पडला? अवकाळी पाऊस वरदान ठरणार?
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
Will there be high sowing in Rabi season this year
यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी पेरण्या होणार?
Madhya Vaitarna, Modak Sagar, water wasted,
मुंबई : मध्य वैतरणा आणि मोडक सागर धरणांदरम्यान बंधारा बांधणार, धरणातील विसर्गातून वाया जाणारे पाणी वाचवणार

उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यापूर्वीच नाशिक जिल्ह्यातील काही धरणांनी तळ गाठण्यास सुरुवात केल्यामुळे टंचाईचे संकट गंभीर वळणावर आले आहे. गतवर्षी पावसाअभावी बहुतांश धरणांत समाधानकारक जलसाठा झाला नव्हता. उपलब्ध जलसाठय़ाचे नियोजन करण्यास विलंब झाल्यामुळे जसजसा उन्हाळ्याचा हंगाम पुढे सरकत आहे, तसतसे या संकटाची धग प्रकर्षांने जाणवत आहे.

टळटळीत उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन प्रचंड वेगाने होत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील गौतमी गोदावरी, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, नांदुरमध्यमेश्वर, भोजापूर, गिरणा, नागासाक्या ही आठ धरणे पूर्णपणे कोरडी झाली आहेत. गतवर्षी याच कालावधीत रिक्त झालेल्या धरणांची संख्या केवळ दोन होती. त्या तुलनेत यंदा ही संख्या चार पटीने वाढली आहे. पुढील काही दिवसांत अल्प जलसाठय़ामुळे आणखी आठ धरणे कोरडीठाक पडणार असल्याचे दिसत आहे. त्यात करंजवण (६ टक्के), वाघाड (८), दारणा (४), भावली (६), मुकणे (१), वालदेवी व कडवा (प्रत्येकी ३), आळंदी (९) या धरणांचा समावेश आहे. या धरणांमधून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी दिले जाते. अखेरच्या टप्प्यात तळाचे पाणी उचलण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. यामुळे पुढील काही दिवसांत ही धरणे रिक्त धरणांच्या यादीत समाविष्ट होतील.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सद्य:स्थितीत १४५७ दशलक्ष घनफूट म्हणजे २६ टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण निम्म्याने कमी आहे. सर्वसाधारणपणे कोणत्याही धरणातील पाण्याचे नियोजन १५ जुलैपर्यंत केले जाते. नाशिक शहरात आठवडय़ातील एक दिवस पूर्णपणे पाणीपुरवठा बंद आणि दररोजच्या पाणीपुरवठय़ात १५ टक्के कपात सुरू आहे. पाणीकपातीच्या निर्णय लागू करण्यास दोन ते तीन महिने विलंब झाल्यामुळे अपेक्षित बचत होऊ शकली नाही. पावसाचे आगमन लांबल्यास पुढील काळात कपातीच्या प्रमाणात वाढ करणे अनिवार्य ठरणार आहे. याशिवाय, ज्या धरणांमध्ये अतिशय कमी जलसाठा आहे, तेथून उचलले जाणारे पाणी गाळमिश्रित राहण्याची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्रात २१५ गावांना टँकरने पाणी

टंचाईच्या गर्तेत सापडलेल्या उत्तर महाराष्ट्रात तब्बल २१५ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकही पाण्याचा टँकर सुरू नसला तरी नाशिक, धुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक गावे व वाडय़ांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. धरणांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये १५९ गावांना १५६ टँकरने पाणी पुरविले जात आहे. धुळे जिल्ह्यत पाच गावांना पाच टँकरने तर जळगाव जिल्ह्यात ५१ गावांना ४३ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नाशिक विभागात अहमदनगर जिल्ह्यात हे संकट अधिक गहिरे आहे. तेथील ४४२ गावांना ७०३ टँकरने पाणी पुरविले जात आहे. उत्तर महाराष्ट्रातील टँकरची संख्या एकूण २०४ इतकी आहे.

१५ धरणांत केवळ सात टक्के जलसाठा

जिल्ह्यातील एकूण २३ पैकी आठ धरणे कोरडीठाक पडली असून अन्य आठ धरणेही तळ गाठण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील १५ धरणांमध्ये १७२८ दशलक्ष घनफूट अर्थात केवळ सात टक्के जलसाठा आहे. गतवर्षी जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये एप्रिलच्या अखेरीस ४६४३ दशलक्ष घनफूट म्हणजे १९ टक्के जलसाठा होता.

चाऱ्याचेही दुर्भिक्ष

पाण्याबरोबर गुरांसाठीच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांची वणवण भटकंती होत असूनही उत्तर महाराष्ट्रातील एकाही जिल्ह्यात आजतागायत चारा छावणी सुरू करण्यात आलेली नाही. काही वर्षांपूर्वी दुष्काळी स्थितीत सिन्नर तालुक्यात चारा छावणी उघडण्यात आली होती. यंदा दुष्काळाची दाहकता अधिक असूनही चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तशी कोणतीही तजवीज केली गेलेली नाही.