नाशिक – ज्या संस्थांमध्ये अफरातफर झाली आहे, अशा संस्थांची पंच समिती, सचिव व संस्था कर्मचारी तसेच बँकेचे संबंधित बँक निरीक्षक, कर्मचारी यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची सूचना जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आली. बड्या थकबाकीदारांची अन्य बँक खाती संलग्नतेची कारवाई केली जाणार आहे. थकबाकीदारांच्या ज्या जमिनीवर संस्थेचे नाव लागले आहे, अशा मालमत्ता ताब्यात घेतल्या जातील. या मालमत्ता इतर शेतकरी सभासदांना वहिवाटीसाठी देण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले.

जिल्हा बँकेच्या सबलीकरणासाठी झालेल्या बैठकीस प्रशासक प्रतापसिंह चव्हाण, जिल्हा लेखापरीक्षक ए. के. पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिंदे आदी उपस्थित होते. बँकेची एकूण दोन हजार कोटींची रक्कम थकीत असून यातील १४५२ कोटींची जुनी थकबाकी आहे. एकट्या दिंडोरी तालुकयात ४३४ कोटीची थकबाकी आहे. या तालुक्यातील बड्या व प्रभावशाली थकबाकीदारांविरोधात हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न फेडणाऱ्या थकबाकीदारांवर वसुलीसाठी कारवाई सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. २०१६ पूर्वीच्या मोठ्या व प्रभावशाली आणि हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांच्या तालुकानिहाय याद्या तयार करण्यात येत आहेत. थकबाकीदारांच्या जंगम मालमत्ता जप्त करून सातबारा उताऱ्यावर जप्तीचे बोजे लावणे, या मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्याची सूचनाही करण्यात आली.

थकबाकीदारांच्या ज्या जमिनीवर संस्थेचे नाव लागलेले आहे, अशा मालमत्ता जिल्हा बँकेच्या ताब्यात घेतल्या जातील. या मालमत्ता इतर शेतकरी सभासदांना वहिवाटीसाठी देण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले. याबाबत जिल्हा उपनिबंधक दर पंधरवड्यात आढावा घेणार आहेत. बैठकीस बँकेचे वसुली विभागातील अधिकारी, संबंधित संस्थेचे सचिव, बँक निरीक्षक, दिंंडोरी तालुक्यातील विभागीय अधिकारी उपस्थित होते.

थकबाकीदारांची अन्य बँक खाती संलग्न करणार

बड्या व प्रभावशाली थकबाकीदारांनी नोटीसा व वारंवार तगादे करूनही थकीत कर्ज रकमेचा बँकेत भरणा केला नाही. अशा थकबाकीदारांचे राष्ट्रीयकृत बँका व इतर बँकेतील खात्यांना सहकारी संस्था अधिनियमान्वये थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेकडून संलग्न (अटॅच) करण्याच्या आदेशाची अमलबजावणी कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती बँकेने दिली आहे.

Story img Loader