नाशिक : अनुत्पादित कर्जामुळे (एनपीए) बँकिंग परवाना रद्द होण्याची टांगती तलवार असणाऱ्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहभागी बँकेवर दायित्व कमी करण्यासाठी स्वत:ची मुख्यालय असलेली अलिशान इमारत विकण्याची वेळ आली आहे. या माध्यमातून बँकेचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न आहे. कधीकाळी राज्यात नावाजलेली जिल्हा बँक संचालकांचा अनिर्बंध कारभार, वाढती थकबाकी, एनपीए आणि तोट्यामुळे अडचणीत आली.

निश्चलनीकरणानंतर तिची अवस्था अधिक बिकट झाली. थकीत कर्जामुळे रिझर्व्ह बँकेने बँकिंग परवाना रद्द करण्यासंबंधी नोटीस बजावली होती. या संकटातून बँकेला बाहेर काढण्यासाठी कृती आराखडा सादर करण्यात आला. तो मंजूर होण्यासाठी मार्च अखेरपर्यंत कर्ज वसुलीचे अपेक्षित लक्ष्य गाठणे अपेक्षित होेते. परंतु, कर्जमाफीच्या चर्चेमुळे अनुत्पादक कर्जाची फारशी वसुली झाली नाही.

सद्यस्थितीत १६०० कोटींचे कर्ज थकीत असून यामध्ये १२०० कोटींच्या अनुत्पादक कर्जांचा समावेश आहे. त्यातच कृषिमंत्री ॲड. माणिक कोकाटे यांनी सक्तीच्या वसुलीला नुकतीच स्थगिती देण्याची सूचना केली. या परिस्थितीत तोटा कमी करण्यासाठी द्वारका चौक परिसरातील बँकेची बहुमजली इमारत विक्री करण्याचे ठरविण्यात आले. यासंबंधीचा प्रस्ताव सहनिबंधकांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आल्याचे बँकेचे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण यांनी सांगितले.

जिल्हा बँकेचे कामकाज सध्या सीबीएसजवळील जुन्या मुख्यालयातून चालते. करोनापूर्वी म्हणजे २०१८ मध्ये द्वारका चौकातील नव्या इमारतीतून मुख्यालयाचा कारभार जुन्या इमारतीत स्थलांतरीत झाला होता. तेव्हापासून द्वारका चौकातील बहुमजली इमारत रिक्त पडून आहे. वीज देयक आणि देखभालीचा भार सोसावा लागत अल्याने ही जागा भाडेतत्वावर देण्याचा विचार झाला. परंतु, नाबार्डच्या निकषात नसल्याने तो सोडून द्यावा लागला. बँकेचा तोटा कमी करण्यासाठी तिची बाजारभावाने विक्रीचे नियोजन प्रगतीपथावर आहे.

कृषिमंत्र्यांच्या कार्यकाळातील इमारत

मंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत अतिशय मोक्याच्या ठिकाणी जिल्हा बँकेची अलिशान इमारत आहे. बँकेच्या भरभराटीच्या काळात तत्कालिन अध्यक्ष तथा विद्यमान कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारातून द्वारका चौकालगत जिल्हा बँकेच्या मुख्यालयाची ही अलिशान इमारत उभारण्यात आली होती. सीबीएसजवळील जुन्या इमारतीतून मुख्यालय २००७ मध्ये नव्या इमारतीत स्थलांतरीत झाले होते. पुढील काळात ही इमारत बँकेला फलदायी ठरली नसल्याची काही संचालकांची भावना झाली. त्यांनी मुख्यालय पुन्हा जुन्याच इमारतीत नेण्याचा आग्रह धरला. तत्कालीन भाजपचे पदाधिकारी आणि बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या कार्यकाळात म्हणजे २०१८ मध्ये जिल्हा बँकेचे मुख्यालय पुन्हा जुन्या इमारतीत आल्याचे बँकेच्या वर्तुळातून सांगितले जाते.

बांधीव क्षेत्रफळ ४८ हजार चौरस फूट

मुंबई-आग्रा महामार्गालगत मोक्याच्या जागेवर नाशिक जिल्हा बँकेची बहुमजली इमारत आहे. या भूखंडाचे क्षेत्रफळ २६ हजार ११९ चौरस फूट तर, बांधीव इमारतीचे क्षेत्रफळ ४८ हजार २७० चौरस फूट आहे. बँकेच्या सभागृहातील गालिचा (कार्पेट) दुबईतून आणल्याचे सांगितले जाते.