नाशिक : चैत्रात साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या श्री सप्तश्रृंगी गडावर यात्रा भरत असते. उत्सव कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गड परिसरात पाहणी करुन संबंधित विभागांना पाणी, भाविकांसाठी आवश्यक सुविधा यासंदर्भात सूचना केल्या. उत्सव काळात अधिकारी आणि कर्मचारी यांना आलेले अनुभव, कामात झालेल्या चुका याविषयी लेखी स्वरूपात अहवाल द्यावा तसेच भाविकांचाही प्रतिसाद नोंदवून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा यांनी केले आहे.
चैत्र उत्सव पाच ते १२ एप्रिल या कालावधीत सप्तश्रृंगी गडावर होत आहे. यात्रोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. गडावर जाणारे रस्ते, तेथील नियोजन याचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. याअंतर्गत तीर्थ विकास आराखडा प्राप्त निधी, त्याअंतर्गत झालेली कामे याविषयी माहिती घेतली. काही कामांविषयी जिल्हाधिकारी यांनी सूचना केल्या. काम पूर्ण झाल्यावर पुन्हा पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक गडावरही येऊ शकतात. त्याअनुषंगाने रस्ते, वाहनतळाची काय व्यवस्था असेल, याविचारणा करण्यात आली. चैत्र उत्सवात खासगी वाहन गडावर जाणार नाही. नांदुरी येथे ही वाहने ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या जागेत उभी करण्यात येतील. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ठरवून दिलेल्या दरपत्रकानुसार दर आकारण्यात येतील. गडावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससाठी वाहनतळाची व्यवस्था आहे.
वन विभागाच्या वतीने दरड कोसळू नये, यासाठी जाळ्या लावण्यासह अन्य काही कामे पूर्ण झाली आहेत. राज्य परिवहन महामंडळाला चांगल्या स्थितीमधील बस देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. काही भाविक पायी गडावर येतात. गडावर येण्याच्या मार्गावर देवस्थानच्या वतीने मंडप टाकण्यात येणार आहे. जेणेकरून भाविकांना सावली मिळेल. तसेच आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णवाहिका, आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास काय करता येईल, याविषयी आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत. गडावर माकडांची संख्या अधिक असल्याने एखाद्या माकडाने चावा घेतल्यास उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याचे नमुनेही तपासण्यात आले आहेत.
उत्सव काळात होणारी गर्दी पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. देवस्थान तसेच रज्जूमार्ग ठिकाणी २०० हून अधिक कॅमेरे आहेत. या सर्वांची पाहणी प्रशासनाच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या नियंत्रण कक्षातून होईल. उत्सव काळात येणारे अनुभव, झालेल्या चुका, अजून काय करता येऊ शकले असते, यासंदर्भात आढावा बैठकीत लेखी स्वरूपात अहवाल मागविण्यात आला आहे. हाच अहवाल भाविकांकडून अपेक्षित आहे. यासाठी समाजमाध्यमातून, क्यूआर कोड किंवा लेखी स्वरूपात भाविकांकडून प्रतिसाद मागवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.