सूरज मांढरे यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती
नाशिक : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची मंगळवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. या पदाची जबाबदारी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. जिल्हाधिकारी म्हणून राधाकृष्णन यांचा कार्यकाळ आधीच पूर्ण झाला होता. निवडणुकीच्या तोंडावर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मात्र, त्यांचे नांव यादीत नव्हते. निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून सामान्य प्रशासन विभागाला हा निर्णय घेणे भाग पडल्याचे सांगितले जाते.
लोकसभा निवडणुकीत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर असते. महत्वाच्या पदावर कार्यकाळ पूर्ण करणारे तसेच ज्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत आधी दोन निवडणुका पार पडल्या, त्यांची बदली करावी, असे निवडणूक आयोगाला अभिप्रेत असते. आयोगाच्या निकषानुसार राज्यात अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. परंतु, राधाकृष्णन यांची बदली झाली नव्हती. यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाल्यावर मंगळवारी राधाकृष्णन यांच्या बदलीचे वृत्त येऊन धडकले आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील वातावरण बदलले. महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची बदली झाली आहे. हे पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून नियुक्ती करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे. नवीन जिल्हाधिकारी म्हणून सूरज मांढरे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना पदाचा कार्यभार लगेचच स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे.
राधाकृष्णन यांनी मे २०१६ मध्ये जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली होती. या पदावर त्यांना पावणे तीन वर्ष झाली. मध्यंतरी त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. नंतर आचारसंहिता लागू झाल्याने बदलीचा विषय मागे पडला. नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीशी संबंधित कामांची तयारी त्यांनी सुरू केली. रविवार, सोमवार असे सलग दोन दिवस आढावा बैठक घेत कामांना गती दिली. या दरम्यान अकस्मात राधाकृष्णन यांच्या बदलीचे आदेश धडकल्याने प्रशासकीय वर्तुळास धक्का बसला. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, जिल्ह्य़ात तीन वर्ष पूर्ण करणाऱ्या जवळपास १५ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आधीच बदल्या झाल्या आहेत. कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या. सर्व अधिकाऱ्यांना एक निकष आणि जिल्हाधिकाऱ्यांना वेगळा निकष कसा, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
दरम्यान, जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या मांढरे यांना निवडणुकीच्या प्रशासकीय तयारीला लागावे लागणार आहे. लोकसभा निवडणूक शांततेत आणि सुरळीतपणे पार पाडण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. जिल्ह्य़ातील जवळपास नऊ तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे. मांढरे यांनी अमरावती, बुलढाणा येथे उपजिल्हाधिकारी, पुणे महापालिकेत उपायुक्त, वखार महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले आहे.
जिल्हा प्रशासनाची धांदल
निवडणुकीच्या कामांची तयारी सुरू असतानाच हा निर्णय घेण्यात आला. निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून सामान्य प्रशासन विभागाला हा निर्णय घेणे भाग पडल्याचो बोलले जाते.