नाशिक – ३० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेलेले जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या घरातून सुमारे १६ लाखांची रोकड, ३६ लाख रुपयांचे ५४ तोळे दागिने, दोन अलिशान मोटार, उच्चभ्रू वसाहतीत सदनिका, मालमत्तेची कागदपत्रे तसेच अनेक बँक खात्यांची पुस्तके सापडली आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकाविरोधात दाखल तक्रारीवर सुनावणी घेऊन तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी ३० लाखांची लाच घेताना जिल्हा उपनिबंधक खरे यांच्यासह वकिलाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले होते. न्यायालयाने खरेला १९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हेही वाचा – नाशिक : शुक्रवारी एकलव्य निवासी शाळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
सोमवारी रात्री कॉलेज रोडवरील खरे यांच्या निवासस्थानी ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार हे जिल्ह्यातील एका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अलीकडेच निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात सहकार विभागाकडे एक प्रकरण दाखल आहे. त्यावर सुनावणी घेऊन तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे (५७) आणि मध्यस्ती वकील शैलेश सभद्रा (३२) यांनी ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम निवासस्थानी आणून देण्यास सांगितले होते. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. आई हाईट्स इमारतीतील निवासस्थानी तक्रारदाराकडून ३० लाख रुपये स्वीकारताना खरे आणि वकील सभद्रा या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. लाचखोरीत जिल्हा उपनिबंधकासारखा बडा अधिकारी अडकल्याने सहकार वर्तुळात खळबळ उडाली. दरम्यान, जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांसाठी काही दिवसांपूर्वीच निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. अनेक समित्यांमध्ये दोन्ही गटांनी परस्परांविरोधात सहकार विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत. अशाच एका प्रकरणात खरे यांनी लाचखोरीचे हे उद्योग केल्याचे दिसून येते. संशयित खरे आणि वकील सभद्राला अटक करून येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने खरेला पोलीस कोठडी तर सभद्राला न्यायालयीन कोठडी सुनावली.
जिल्हा उपनिबंधक खरेच्या घरातून १५ लाख ८६ हजाराची रोकड जप्त करण्यात आली. तसेच ३६ लाख रुपये किंमतीचे ५४ तोळे सोन्याचे दागिने, दोन मोटारी, अन्य मालमत्तेची कागदपत्रे, विविध बँकांची खाते पुस्तक ताब्यात घेण्यात आले. कॉलेजरोडसारख्या उच्चभ्रू वसाहतीत खरे अलिशान सदनिकेत वास्तव्यास आहे. बँक खात्यांची पडताळणी होणे अद्याप बाकी आहे. – शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक)