नाशिक – जिल्हा शासकीय रुग्णालयातील व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनाचा निषेध करण्यासाठी तसेच सुरक्षेसंदर्भात आवश्यक ठोस उपाययोजना योजाव्यात या मागणीसाठी मंगळवारी रुग्णालयातील परिचारिकांनी प्रवेशद्वारावर काळ्या फिती लावून आंदोलन केले.

रविवारी सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतील आपतकालीन कक्षात बाहेरुन आलेले दोन गट परस्परांशी भिडले. दोन्ही गटांकडून वीट, दगड, रुग्णालयातील खुर्च्या आदी सामानाचा मारहाणीसाठी वापर झाला. रुग्णालय व्यवस्थापनाकडे कमी सुरक्षारक्षक असल्याने त्यांचा यावेळी निभाव लागला नाही. हाणामारीत एक परिचारिका जखमी झाली. एवढा गदारोळ होऊनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, रुग्ण परिचारिका अधीक्षक रजेवर असल्याने रुग्णालयाच्या वतीने सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास कोणी पुढे आले नाही. घटनेच्या २४ तासानंतर सोमवारी रात्री सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचा दावा होत आहे.

या घटनेत जखमी झालेल्या परिचारिकेची रुग्णालयातील अधिकाऱ्यांकडून विचारपूसही झाली नाही. या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील परिचारिकांनी एकत्र येत व्यवस्थापनाच्या नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी काळ्या फिती लावून आंदोलन केले. रुग्णालयाचे कुटूंब प्रमुख असूनही डॉ. शिंदे केवळ बघ्याच्या भूमिकेत आहेत. कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यात त्यांना स्वारस्य नाही, अशा तक्रारी यावेळी करण्यात आल्या.

नाशिक जिल्हा नर्सेस असोसिएशनच्या अध्यक्षा पूजा पवार यांनी भूमिका मांडली. परिचारिकांना सुरक्षेविषयी मुद्दा मांडल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी होते. कायमस्वरूपी बंदुकधारी सुरक्षारक्षक कामाच्या ठिकाणी मिळावा, ही मागणी आहे. गोंधळ घालणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आहे. योग्य कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पवार यांनी दिला.

दोन गटात मारामारी झाली होती. उपचारासाठी त्यांना पोलीस रुग्णालयात घेऊन आले होते. याठिकाणी त्यांनी पुन्हा मारामारी केली. या मध्ये एक परिचारिका जखमी झाली. या प्रकारानंतर तातडीने पोलिसांना बोलविण्यात येऊन कार्यवाही केली.- डॉ. चारूदत्त शिंदे (जिल्हा शल्य चिकित्सक)

जिल्हा रुग्णालयातील मारहाणीप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. रुग्णालय आवारातील पोलीस चौकीला काही सूचना दिल्या आहेत. या ठिकाणी गस्त वाढवण्यात येईल. रुग्णालय व्यवस्थापनाला सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्यास सांगितले आहे.- किरणकुमार चव्हाण

Story img Loader