नाशिक : शिक्षणामुळे समाजाच्या विचारात, आचारात फरक पडतो. शिक्षण हे परिवर्तनाचे माध्यम आहे. अल्पसंख्यांक असूनही देशाची गरज लक्षात घेऊन राष्ट्र सेवा, शिक्षण, आरोग्य अशा वेगवेगळ्या विभागात माहेश्वरी समाज काम करत आहे. समाज नेहमीच मदतीसाठी कायम पुढे असतो, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले.
नाशिक जिल्हा माहेश्वरी सभा आणि डॉ. श्रीकांत कारवा फाउंडेशन यांच्या वतीने येथे प्राथमिक शाळा, रुग्णालय, विद्यार्थी भवन आणि वृध्दाश्रम यांचे भूमिपूजन बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बिर्ला यांनी, माहेश्वरी समाजाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या उपक्रमामुळे संपूर्ण समाजाला याचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. माहेश्वरी समाज अल्पसंख्यांक असूनही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने मदतीसाठी कायम पुढे राहतो. आज समाजाने केलेल्या दानामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. नाशिकमधून जे धन प्राप्त झाले ते याच भूमीत समर्पित केले. भारत हा वेगळा देश आहे. या ठिकाणी वादविवाद होतात. विचार पटता पटत नाहीत. परंतु, यातून एक विचार घेऊन आपण पुढे जातो. यामुळे देशाची वसुधैव कुटुम्बकम ओळख असल्याचे बिर्ला यांनी नमूद केले.
हे ही वाचा…नाशिकमध्ये शेततळ्यात दोन मुले बुडाली
यावेळी डॉ. श्रीकांत कारवा, उमेश मुंदडा यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बिर्ला यांच्या हस्ते महेश जीवन गौरव पुरस्काराने प्रदीप बुब यांच्या कुटूंबियांना तसेच महेश कर्मवीर पुरस्काराने ज्येष्ठ सनदी लेखापाल अशोक झंवर, ब्रिजलाल बाहेती, पुरूषोत्तम काबरा, प्रकाशचंद कलंत्री, रामकिसन करवा आणि नंदलाल भुतडा यांना सन्मानित करण्यात आले.