नाशिक : जिल्ह्यात एक जून ते ११ जुलै या कालावधीत सरासरीच्या तुलनेत २३१.१ मिलीमीटर म्हणजे ८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. नऊ तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक तर, सहा तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. एरवी सर्वाधिक पाऊस होणाऱ्या घाटमाथ्यावरील चार तालुक्यांत सरासरीच्या निम्मा वा त्याहून कमी पाऊस झाला आहे. राज्यात मुसळधार पाऊस सुरू असताना नाशिक जिल्ह्यात जुलैच्या मध्यापर्यंत सर्वसाधारण सरासरी गाठण्या इतकाही पाऊस झालेला नाही.
मागील २४ तासात काही भागात हलकासा शिडकावा झाला. दिवसभर हवामान ढगाळ होते. परंतु, रात्रीपर्यंत पाऊस झाला नाही. दोन, तीन आठवड्यांपासून हीच स्थिती आहे. अधुनमधून हजेरी लावून पाऊस गायब होतो. प्रशासनाच्या अहवालानुसार एक जून ते ११ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सर्वसाधारपणे सरासरी २८४ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा सरासरीच्या ५३ मिलीमीटर म्हणजे १९ टक्के कमी पाऊस झाला आहे.
हेही वाचा…नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा १४ टक्क्यांच्या आत, अधिक धरणांच्या तालुक्यात कमी पाऊस
आतापर्यंत मालेगाव तालुक्यात सरासरीच्या तुलनेत १९९ मिलीमीटर, बागलाण (१७५), कळवण (१३३), नांदगाव (२१५), सुरगाणा (२८४), नाशिक (१३७), दिंडोरी (२२५), इगतपुरी (३८३), पेठ (३११), निफाड (२०१), सिन्नर (२१६), येवला (१८८), चांदवड (२७५), त्र्यंबकेश्वर (४९९), देवळा २४१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस सुरगाणा, इगतपुरी, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांत झाला आहे. मुळात घाटमाथ्यावरील या भागात दरवर्षी मुसळधार पाऊस होतो. याशिवाय कळवण, नाशिक या तालुक्यातही पावसाचे प्रमाण तुलनेत कमी आहे.
हेही वाचा…सुश्रुत प्रणालीमध्ये वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यात प्रथम
मालेगाव, बागलाण, नांदगाव, दिंडोरी, निफाड, सिन्नर, येवला, चांदवड व देवळा या नऊ तालुक्यांत सरासरीच्या अधिक पाऊस झालेला आहे. गेल्या वर्षी ११ जुलैपर्यंत जिल्ह्यात १८८. ५ मिलीमीटर (६६.४ टक्के) पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा पाऊस अधिक झाला असला तरी सहा तालुक्यांत त्याचे प्रमाण बरेच कमी आहे.