नाशिक : नाफेडचा कांदा देशातील घाऊक बाजारात विक्री करू नये आणि केंद्राने लागू केलेला ४० टक्के निर्यातकर मागे घ्यावा, यासह अन्य मागण्या मान्य होईपर्यंत लिलावात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट करीत जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांनी लिलाव पूर्ववत करण्याची विनंती धुडकावली.
शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी खळय़ातील कांदा देखील मालमोटारीत भरणा जाणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे शिल्लक मालाचा देशांतर्गत पुरवठा थांबणार आहे. सलग तिसऱ्या दिवशी १५ बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव ठप्प राहिले. कांदा व्यापाऱ्यांची मंगळवारी पणनमंत्र्यांशी बैठक होणार आहे. तोपर्यंत लिलाव पूर्ववत करावे, अशी विनंती पालकमंत्री दादा भुसे यांनी केली होती. मात्र, त्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला.
हेही वाचा >>> अमळनेर तालुक्यातील बोरी नदीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला
शुक्रवारी जिल्हा कांदा व्यापारी संघटनेची येवला येथे बैठक पार पडली. यावेळी विविध मुद्यांवर चर्चा होऊन व्यापाऱ्यांनी लिलावापासून दूर राहण्याची भूमिका कायम ठेवल्याचे संघटनेचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी सांगितले.
नाफेडचा कांदा देशातील घाऊक बाजारात कमी किंमतीत विकला जातो. त्यामुळे व्यवसाय करणे अशक्य झाले आहे. त्याची घाऊक बाजारातील विक्री थांबविणे, निर्यात कर, बाजार समिती शुल्क, एक दराने आडत यावर तोडगा निघेपर्यंत खरेदीत उतरणार नसल्याचा निर्धार करण्यात आला. नाफेड २४०० रुपयांना कांदा घेऊन दोन हजार रुपयाने विकू शकते. पण आम्ही तसे करू शकत नाही. स्थानिक व्यापाऱ्यांनी आपले परवाने आधीच जमा केलेले असल्याने प्रशासनाचा कारवाईचा मुद्दा निकाली निघाल्याचे संघटनेने सूचित केले. या स्थितीमुळे देशभरातील कांदा कोंडीत भर पडणार आहे.
कांदा उत्पादकांची नाराजी
पुणे : व्यापाऱ्यांनी नाशिकमध्ये कांदा खरेदी-विक्री बंद केली आहे. हा बंद शेतकऱ्यांच्या विरोधात आणि शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी करणारा आहे, असा आरोप शेतकरी संघटनांचे नेते आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.खरीप हंगामातील कांद्याची काढणी ऑक्टोबरमध्ये सुरु होईल. रब्बी हंगामाच्या तयारीसाठी, दसरा, दिवाळीसाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असतानाच्या काळात व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी-विक्री बंद करून सरकारची नाही, तर शेतकऱ्यांचीच आर्थिक कोंडी केली आहे, असा आरोप सिन्नर येथील कांदा उत्पादक शेतकरी अमोल मुळे यांनी केला