आदिवासी उपयोजनेंतर्गत नाशिक जिल्ह्याच्या २०१६-१७ च्या ४६४.७२ कोटींच्या प्रारूप आराखडय़ास मान्यता देण्यात आली आहे.
याबाबतची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली. जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या बैठकीस आदिवासी विकास सचिव राजगोपाल देवरा, जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर उपस्थित होते.
बैठकीत धुळे जिल्ह्याचा १६३.७४ कोटी, नंदुरबार ४४०.५० कोटी, जळगाव ७२.७९ कोटी, अहमदनगर ७५.३३ कोटी, ठाणे ११६.४४ कोटी आणि पालघरचा ४४८.७६ कोटींचा प्रारूप आराखडा अंतिम करण्यात आला.
नाशिक जिल्ह्य़ाच्या आराखडय़ांतर्गत टीएसपीसाठी ३९६.९० कोटी, ओटीएसपी ५४.८१ कोटी आणि माडा व मिनीमाडासाठी १३ कोटी नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला.
त्यात मागासवर्गीय कल्याण १८५.९३ कोटी, रस्ते विकास ४६.४८ कोटी, लघुपाटबंधारे ४६.९६ कोटी, आरोग्य ३८.९१ कोटी या महत्त्वाच्या विकास योजनांचा समावेश आहे. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, दुसऱ्या टप्प्यात अंगणवाडी बालकांना अंडी व केळी देण्याचे नियोजन तसेच या वर्षी विकासकामांसाठी देण्यात आलेला निधी वेळेवर खर्च होईल यासाठी योग्य नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दुर्गम भागात सोलर प्रणालीवर चालणाऱ्या लहान नळपाणी पुरवठा योजना उपयुक्त ठरणार असल्याने त्यांच्या उपयुक्ततेबाबत माहिती घ्यावी आणि लाभदायक असल्यास अशा योजना प्रस्तावित कराव्यात असे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik district tribal draft plan approve