नाशिक: तापमानाचा पारा उंचावत असताना जिल्ह्यातील धरणसाठा २८ टक्क्यांवर आला आहे. दोन धरणे कोरडीठाक झाली असून जलसाठ्याला बाष्पीभवनाची झळ काहीअंशी सहन करावी लागत आहे. दुसरीकडे पाणी टंचाईची तीव्रता दिवसागणिक वाढत असून तहानलेल्या गावांची संख्या वेगाने वाढत असल्याने टँकर व त्यांच्या फेऱ्याही वाढत आहेत. सद्यस्थितीत २१९ गावे, ४७७ वाड्या अशा एकूण ६९६ ठिकाणी २३८ टँँकरने पाणी पुरवठा होत आहे. मागील आठवड्यात हे प्रमाण ६३९ गाव-वाड्या इतके होते. तर टँकरची संख्या २१० इतकी होती.
जिल्ह्यातील धरणसाठा वेगाने कमी होत असून एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये १८ हजार ७३२ दशलक्ष घनफूट इतका जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणांमध्ये २९ हजार ३८ दशलक्ष घनफूट म्हणजे ४४ टक्के पाणी होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास १६ टक्के कमी जलसाठा आहे. नागासाक्या धरण आधीपासून कोरडेठाक आहे. यात आता पुणेगावची भर पडली. तसेच वाघाड (१४ टक्के), ओझरखेड (१२), भावली (१३), कडवा (१९), केळझर (१७), माणिकपूंज (नऊ टक्के) या धरणांमध्ये अल्प जलसाठा आहे.
हेही वाचा : कांदा लिलाव ११ दिवसांपासून बंद; नाशिकमध्ये एक लाख क्विंटलची खरेदी-विक्री ठप्प
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ४५ टक्के जलसाठा आहे. काश्यपीत ८२६ दशलक्ष घनफूट (४४), गौतमी गोदावरी ६५५ (३५), आळंदी २२५ (२७), करंजवण ८५८ (१५), ओझरखेड २७० (१२), दारणा १७४७ (२४), मुकणे २२८४ (३०), वालदेवी ४८१ (४२), चणकापूर ४७९ (१९), हरणबारी ४४७ (३८)), गिरणा ५५३२ (२९), पुनद ९०३ दशलक्ष घनफूट (६९टक्के) असा जलसाठा आहे. नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात ८७ टक्के जलसाठा आहे. तर पालखेडमध्ये ३०८ दशलक्ष घनफूट (४७ टक्के) जलसाठा आहे.
हेही वाचा : जळगावला तुरळक; जामनेरमध्ये जोरदार पाऊस, मका, केळी, ज्वारी पिकांचे नुकसान
नऊ तालुक्यांत टँकर
जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. या भागातील २१९ गावे, ४७७ वाड्यांना २३८ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत टंचाईच्या गर्तेत न सापडलेल्या सुरगाणा, इगतपुरी तालुक्यात काही ठिकाणी टँकर सुरू करावे लागले. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्यासाठी प्रशासनाला खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे क्रमप्राप्त ठरले. गावांसाठी १२ तर टँकरसाठी ९९ अशा एकूण १११ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. आठवडाभरात ४४ विहिरी नव्याने अधिग्रहीत कराव्या लागल्या. एप्रिलच्या मध्याकडे वाटचाल सुरू असताना टंचाईचे चटके सर्वत्र बसत आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार नांदगाव तालुक्यात ४७ गावे व २२२ अशा एकूण २६९ गाव-वाड्यांना (४९) टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मालेगाव तालुक्यात १०७ गाव-वाडे (३६ टँकर), येवला तालुक्यात ७७ (४५ टँकर), बागलाण ३५ (३२), चांदवड ७० (२७), देवळा ५६ (२९), इगतपुरी एक (एक), सुरगाणा पाच (दोन), सिन्नर ७६ (१७) असे टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात १११ टँकरमार्फत दैनंदिन ४९२ फेऱ्या मारल्या जात आहेत. प्रशासनाने बागलाण तालुक्यात ३७, चांदवडमध्ये दोन, देवळा २९, मालेगाव ३१, नांदगाव चार आणि येवला तालुक्यात सहा विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. नाशिक, त्र्यंबकेश्वर, कळवण, निफाड, दिंडोरी व पेठ या सहा तालुक्यात अद्याप टँकरने पाणी देण्याची वेळ आलेली नाही.