नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आतापर्यंत १३ उमेदवारांनी २२ अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शुक्रवार ही अंतिम मुदत आहे. शिवसेना ठाकरे गटाने ॲड. संदीप गुळवे यांना आधीच उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे नाशिक लोकसभा निवडणुकीप्रमाणे महायुतीने या जागेवरून घोळ घातला असून शिवसेना शिंदे गटाच्या जागेवर भाजपने हक्क सांगितला आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजेंद्र निकम (मालेगाव) यांनी टी.डी.एफ. जुनी पेन्शन संघटनेतून अर्ज सादर केला. दिलीप डोंगरे (संगमनेर) आणि अमृतराव शिंदे (अहमदनगर) यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. नाशिक, इगतपुरी, सिन्नर, रानवड आदी भागातील १३ इच्छुकांनी अर्ज नेले. आतापर्यंत १३ उमेदवारांनी एकूण २२ अर्ज सादर केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा…नाशिक : कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने गंडा, संशयितास आठ दिवसांची कोठडी

सात जून हा अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. आदल्या दिवसापर्यंत महायुतीचा उमेदवार निश्चित झालेला नाही. राज्यातील लोकसभेच्या निकालाचा परिणाम या जागा वाटपावर झाल्याचे दिसत आहे. या मतदारसंघातील शिवसेना पुरस्कृत आमदार किशोर दराडे यांनी यंदाही अपक्ष म्हणून आपला अर्ज दाखल केला. शिवसेना शिंदे गटाकडून त्यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरू होता. तथापि, दराडे यांनी फारशी उत्सुकता दाखविली नाही. दरम्यानच्या काळात भाजपच्या इच्छुकांनी ही जागा आपल्या पक्षाकडे घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. शिवसेना ठाकरे गटाने आमदार किशोर दराडे यांची प्रतीक्षा न करता काँग्रेसचे नेते ॲड. संदीप गुळवे यांना पक्षात प्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना एबी अर्जही दिला आहे. गुळवे हे शुक्रवारी आपला अर्ज दाखल करणार आहेत. ठाकरे गटाने उमेदवार निश्चित करून तयारीला वेग दिला असताना महायुतीत लोकसभा निवडणुकीप्रमाणे घोळ सुरू आहे.

हेही वाचा…जिल्ह्यात आजपासून विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा – विविध कार्यक्रमांचे आयोजन

डॉ. राजेंद्र विखे यांची मोर्चेबांधणी

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे. महायुतीत ही जागा शिवसेनेकडे (शिंदे गट) आहे. डॉ. विखेंनी महायुतीकडून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी आणखी काही इच्छुक आहेत. या जागेबाबत महायुतीतील मित्र पक्षात चर्चा सुरू आहे. अंतिम क्षणी निर्णय होण्याची आशा इच्छुक बाळगून आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत एबी अर्ज सादर करावा लागणार आहे. महायुतीत या जागेवर काही तडजोड होते की एखाद्याला पुरस्कृत करण्याची वेळ येते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik division teacher constituency election mahayuti seat allocation uncertainty bjp also claims on seat psg
Show comments