नाशिक – इयत्ता १० वीच्या परीक्षेत नाशिक विभागीय मंडळाचा निकाल ९२.२२ टक्के लागला. विभागात उत्तीर्णतेत जळगाव जिल्हा आघाडीवर असून इयत्ता १२ वीप्रमाणे १० वीतही नाशिक जिल्हा पिछाडीवर आहे. उत्तीर्णतेच्या टक्केवारीत मुलींनी पुन्हा वर्चस्व राखले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकाल ४.१० टक्क्यांनी घसरला.
मार्च-एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी आभासी पद्धतीने जाहीर करण्यात आला. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी, पालक संगणक आणि भ्रमणध्वनीकडे डोळे लावून बसले होते. या परीक्षेला नियमित आणि पुनर्परीक्षार्थी असे एकूण एक लाख ९५ हजार ५०० विद्यार्थी बसले होते. त्यातील एक लाख ७९ हजार ४७५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याबाबतची माहिती नाशिक विभागीय मंडळाकडून देण्यात आली.
हेही वाचा >>>नाशिक जिल्ह्यात ६६ दारू अड्ड्यांवर एकाचवेळी छापे; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
नियमित विद्यार्थ्यांच्या निकालाचा जिल्हानिहाय विचार केल्यास नाशिक (९१.१५), धुळे (९२.२६), जळगाव (९३.५२), नंदुरबार (९३.४१) अशी टक्केवारी आहे. विभागात बसलेल्या एकूण मुलांपैकी एक लाख चार हजार ४३६ विद्यार्थी अर्थात ९०.३५ टक्के उत्तीर्ण झाले. तर एकूण ८९ हजार ९० मुलींपैकी उत्तीर्णतेचे हेच प्रमाण ८३ हजार ४१६ असून टक्केवारी ९४.४४ इतकी आहे. अंतर्गत मूल्यमापनामुळे विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी लक्षणीय गुण मिळाले होते. यंदा नेहमीच्या पध्दतीने परीक्षा झाल्यामुळे निकालात घसरण झाल्याचे दिसून येते.
ऑनलाइन निकाल जाहीर झाला असला तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिका १४ जून रोजी दुपारी तीन वाजता आपापल्या शाळांमध्ये मिळणार आहेत. तसेच शनिवारपासून गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सोय करण्यात आली आहे. संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतीसह तीन ते १२ जून या कालावधीत विहित शुल्क भरून अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम छायाप्रत घेणे अनिवार्य असून ही छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसात मंडळाकडे अर्ज करणे आवश्यक राहणार आहे. निकालात घसरण होण्यामागे पारंपरिक पध्दतीने झालेली परीक्षा हे कारण आहे.
हेही वाचा >>>आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी किती जागा लढवणार? छगन भुजबळ म्हणाले, “सध्याची परिस्थिती…”
गैरमार्गाची ७० प्रकरणे
इयत्ता १० वी निकालात विभागात ७० गैरमार्ग प्रकरणे निदर्शनास आली. यात ३३ कॉपीची तर ३७ प्रकरणे परीक्षकांनी निदर्शनास आणून दिलेली होती. नाशिक जिल्ह्यात कॉपीची सर्वाधिक १९ प्रकरणे उघड झाली. धुळे जिल्ह्यात एक, नंदुरबारमध्ये १३ प्रकरणे होती.
परीक्षकांनी निदर्शनास आणलेली गैरमार्गाची नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक १०, धुळे १५, जळगाव नऊ, नंदुरबारच्या तीन प्रकरणांचा समावेश आहे. या प्रकरणात संबंधित विद्यार्थ्यांवर मंडळ शिक्षासूचीनुसार दंड करण्यात आला आहे.
श्रेणीनिहाय उत्तीर्णता
गत वर्षीच्या तुलनेत निकालाप्रमाणे विशेष प्रावीण्य आणि प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली आहे. विभागात विशेष प्रावीण्यप्राप्त ६७ हजार ६०२, प्रथम श्रेणीत ६८ हजार ०७०, द्वितीय श्रेणी ३५ हजार ३९३, तर उत्तीर्ण श्रेणीत ६७११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
(इयत्ता १० वी निकालात यंदाही मुलींनी वर्चस्व राखले. (छाया-यतीश भानू))