नाशिक : मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक नियुक्ती संदर्भात नियमानुसार कार्यवाही न करणे, मुख्याध्यापक, प्राचार्य पदाची मान्यता नसलेल्या व्यक्तीने शालेय दस्तऐवजावर अधिकार नसताना स्वाक्षरी करणे, नववी आणि ११ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना बळजबरीने १७ नंबरचा अर्ज भरण्यास भाग पाडणे, यांसह अन्य नियमबाह्य कामांविषयी नाशिक विभागातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव एम. एस. देसले यांनी कानउघाडणी केली. संबधितांविरुध्द कारवाई करण्याचा इशारा देसले यांनी दिला आहे.
नाशिक विभागातंर्गत येणाऱ्या मान्यताप्राप्त माध्यमिक विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालयांपैकी बहुतांश विद्यालये, महाविद्यालये यांच्या नियमबाह्य कामांविषयी विभागीय सचिवांना तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये शैक्षणिक अर्हता नसताना मुख्याध्यापक, प्राचार्य पदावर शैक्षणिक विभागाची मान्यता नसतानाही नियुक्ती देणे, काही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये इयत्ता १० वी, १२ वी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागण्यासाठी नववी आणि ११ वीत काही विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करतात. त्यांच्याकडून १७ नंबरचा अर्ज जबरदस्तीने भरून घेण्यात येतो. काही शाळा, महाविद्यालयांमध्ये ३० टक्केपेक्षा जास्त विद्यार्थी अनुत्तीर्ण केल्यामुळे १७ नंबरचा अर्ज भरणाऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. अनेक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांकडून वेगवेगळ्या कारणांनी शुल्क आकारले जाते. हे शुल्क न भरल्यास शिक्षण मंडळाकडून देण्यात येणारे गुणपत्रक देतांना विद्यार्थ्यांची अडवणूक करण्यात येते. विद्यार्थ्यांना शालेय सांकेतांक मिळताना अडचण आल्यास दुसऱ्याच शाळेकडून १० वी, १२ वीचा अर्ज भरणे, अशाप्रकारे तक्रारींचे स्वरुप आहे.
हेही वाचा : धुळ्यात शिंदे गटाच्या दोन जिल्हाप्रमुखांमधील वादाचा पक्षाला फटका
दरम्यान, शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांच्या कारभाराविषयी एखाद्या व्यक्तीस अनियमितता अथवा गैरप्रकार निदर्शनास आल्यास मंडळाच्या ०२५३-२९४५२५१ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन देसले यांनी केले आहे. याबाबत संबधितावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.