नाशिक : शहरात रिक्षाचालकांची बेशिस्ती अधिक प्रमाणात वाढल्याने तसेच त्यांच्या बेशिस्तीचा त्रास इतर वाहनधारकांना होऊ लागल्याने त्यांच्याविरोधात अखेर शहरातील राजकीय पक्षही मैदानात उतरले आहेत. मागील आठवड्यात बेशिस्त रिक्षाचालकाने एका मोटार चालकाला मारहाण केल्याचे प्रकरण गाजल्यानंतर वाहतूक पोलीस सक्रिय झाले आहेत. ठिकठिकाणी रिक्षाचालकांना शिस्त लागावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

रिक्षाचालकांची अरेरावी, बेशिस्ती टोकाला पोहचली असतानाही शहरातील एकाही राजकीय पक्षाने त्याविरुध्द आवाज उठविला नसताना आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (अजित पवार) पुढाकार घेतला आहे. गर्दीच्या ठिकाणी बेशिस्त रिक्षाचालक आणि शहर बससेवा सिटीलिंकचे चालक प्रवाशांशी हुज्जत घालतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सहायक पोलीस आयुक्त पद्मजा बढे यांच्याकडे केली आहे.

निवेदनात खैरे यांनी भूमिका मांडली आहे. नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत असताना वाहनधारकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ होत आहे. वाहतूक नियम न पाळणे हा मुद्दा प्रामुख्याने नेहमी जाणवत असतो. रिक्षाचालकांची इतर वाहनधारकांशी हुज्जत आणि रिक्षाचालकांची अरेरावी हा विषय शहरात नित्याचाच झाला आहे. शहरात चौका चौकांमध्ये वाहतूक सुरळीत व्हावी तसेच अपघात टाळण्यासाठी सिग्नल बसविण्यात आले आहेत. परंतु, रिक्षाचालक आणि सिटीलिंक बसचालक सिग्नल नियमांचे पालन करताना दिसत नाहीत, अशी तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.

शहरातील निमाणी बस स्थानक, पंचवटी कारंजा, शालिमार, द्वारका, बिटको, पवननगर यासारख्या गर्दीच्या ठिकाणी रिक्षाचालक हे रस्त्यात कुठेही धाक नसल्यासारखे उभे राहतात. वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास इतर वाहनचालकांशी अरेरावी करून शिवीगाळ, मारहाण करतात. रस्त्याने जाताना एखादा प्रवासी रिक्षाचालकास दिसताच तो कुठल्याही प्रकारचा मागच्या वाहनचालकास इशारा न करता प्रवाशाच्या दिशेने रिक्षा वळवितो. पुढील रिक्षा अचानक वळल्याने किंवा थांबल्याने मागच्या वाहनचालकाचा ताबा सुटून अपघात घडतात. असे प्रकार शहरात नित्याचे झाले आहेत. अनेक रिक्षाचालक वाहतूक पोलिसांना बिल्कूल जुमानत नसल्याचे चित्र आहे.

शहरातील सिटीलिंक शहर बसचालकही वाहतूक नियमांचे पालन करत नाहती. वाहतूक पोलीस ज्याप्रमाणे रिक्षा चालकांवर कारवाई करतात, त्याप्रमाणे सिटीलिंक बस चालकांवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी, वारंवार नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांचा परवाना तातडीने रद्द करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना खैरे यांच्यासह अमोल नाईक, मुकेश शेवाळे, विशाल डोके, विकास सोनवणे आदी उपस्थित होते.

मागील आठवड्यात शहरातील शालिमार भागात बेशिस्त रिक्षाचालकाने धक्का लागल्याचे कारण पुढे करुन मोटारचालकास मारहाण केली होती. त्यामुळे रिक्षाचालकांची अरेरावी आणि बेशिस्तीकडे वाहतूक पोलिसांचे होणारे दुर्लक्ष, हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. विशेष म्हणजे, शहरातील राजकीय पक्षांनीही हा विषय फारसा गांभिर्याने घेतलेला नसताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसने त्याबाबतीत पुढाकार घेतला आहे.