नाशिक : येथील नाशिक शिक्षण संस्थेचे (नाएसो) अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर (७३) यांचे बुधवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून आणि नातवंड असा परिवार आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे रहाळकर यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी दीड वाजता त्यांचे निधन झाल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नाशिक शिक्षण संस्थेच्या कामात रहाळकर यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. १९२३ मध्ये स्थापन झालेली नाशिक शिक्षण संस्था ही शहरातील प्रमुख शैक्षणिक संस्थांपैकी एक मानली जाते.
हेही वाचा : पारोळ्यातील पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना जाळ्यात
संस्थेच्या विविध शाळांमध्ये जवळपास २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. काही वर्षांपासून या संस्थेची जबाबदारी रहाळकर सांभाळत होते. अलीकडेच संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त नानाविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी त्यांनी विविध संकल्पना मांडून पुढाकार घेतला होता. या निमित्ताने आजी-माजी संस्था अध्यक्ष, कार्यवाह, निवृत्त मुख्याध्यापक, शिक्षक, माजी विद्यार्थी अशा अनेकांना एकत्र आणून संस्थेशी ऋणानुबंध कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रा. रहाळकर यांच्या निधनाची माहिती समजताच संस्थेच्या सर्व शाळा मधल्या सुट्टीनंतर सोडून देण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.