नाशिक – प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे महिन्याभरात आठ अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी न्यायालयाने सदर चालक आणि पालकांना प्रत्येकी ३० ते ३२ हजार रुपये दंड केला. पालकांनी अल्पवयीन मुलांकडे वाहन सोपवू नये, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रादेशिक परिवहनच्या वायूवेग पथकाने २०२४ मध्ये एकूण ४३४२ वाहनांची तपासणी केली. त्यात २४६ चालक मद्य पिऊन वाहन चालवित असल्याने दोषी आढळून आले. दोषी वाहन चालकांच्या एका प्रकरणात न्यायालयाने ३७ हजार ५०० रुपये दंड केला. तसेच वाहन चालकास न्यायालयीन कामकाज संपेपर्यंत न्यायालयात उभे राहण्याची शिक्षा करण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने अल्पवयीन वाहन चालकांविरुध्द वारंवार मोहीम राबविण्यात येतात. १८ वर्षांखालील अल्पवयीनांनी कोणतेही वाहन चालविण्याचा गुन्हा केल्यास मोटार वाहन कायद्यातंर्गत त्यांना दोषी ठरविण्यात येऊन वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत वाहन चालविण्याचा परवाना प्राप्त करता येत नाही. तसेच गुन्ह्यांमध्ये दोषी आढळणाऱ्या पालकांना तीन वर्षे कारावास, रुपये २५ हजारांपर्यंत दंड अशी तरतूद करण्यात आली आहे.

त्यामुळे मद्यप्राशन करून स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये. तसेच १८ वर्षांखालील अल्पवयीनांनी कोणतेही वाहन चालवू नये, पालकांनी आपल्या अल्पवयीन पाल्यांना वाहन चालविण्यास देऊ नये. दोषी आढळल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शिंदे यांनी केले आहे.