शहरातील ईएसआय रुग्णालयावर एक लाखाहून अधिक कामगार आणि त्यांचे कुटुंबिय अवलंबून आहेत. कामगारांचा दरमहा ईएसआय केंद्र सरकारकडे जमा होतो आणि प्रशासकीय बाब म्हणून राज्य शासन या रुग्णालयाचे काम सांभाळते. या विचित्र स्थितीमुळे कामगारांना आरोग्य सेवेसाठी नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब खा. हेमंत गोडसे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ईएसआय रुग्णालयांचे लवकरच महामंडळात रुपांतर करण्यात येणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली.

गोडसे यांनी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन ईएसआय रुग्णालयातील स्थितीकडे लक्ष वेधले. एकटय़ा नाशिकच्या रुग्णालयावर अवलंबून असणाऱ्या कामगारांची संख्या एक लाख दोन हजार

इतकी आहे. त्यांच्या कुटुंबियांचा विचार करता ईएसआय रुग्णालयावर चार ते पाच लाख नागरिक अवलंबून आहेत. या रुग्णालयाची राज्याने अथवा केंद्र यापैकी एकाने संपूर्ण जबाबदारी सांभाळणे आवश्यक असल्याचा मुद्दा गोडसे यांनी मांडला.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात कर्करोग केंद्रासाठी अत्याधुनिक वैद्यकीय सामग्रीसाठी ४५ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवला आहे. नाशिकमध्ये गेल्या तीन वर्षांत १८,५०० रुग्ण नोंदले गेले. पुढील काळात त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात नाशिक, नागपूर, लातूर व अमरावती चार शहरांसाठी प्रस्ताव गेला असून त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले. जिल्हा शासकीय रुग्णालयात कुंभमेळ्यासाठी २०० खाटांचे रुग्णालय बांधण्यात आले होते. त्या रुग्णालयाचा वापर केवळ महिलांसाठी करावा आणि त्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीला मान्यता देण्याची

मागणी गोडसे यांनी केली. विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात देखभाल दुरुस्तीच्या रखडलेल्या ७१ लाख रुपयांच्या कामास लवकरच मान्यता देण्याचे आश्वासन सावंत यांनी दिले आहे.