नाशिक : पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेली मराठी टंकलेखन परीक्षा बनावट विद्यार्थ्याने दिल्याचे उघड झाले आहे. यात टंकलेखन (टायपिंग) संस्था चालकाने मदत केल्याचा संशय आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत प्राचार्य जालिंदर झनकर यांनी तक्रार दिली. विकास शिक्रे (खानापूर, पुणे), सानिका कॉम्प्युटर व टायपिग इन्स्टिट्यूटचे संचालक राजेश सायंकर आणि अनोळखी तोतया व्यक्ती अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. गंगापूर रस्त्यावरील प्रमोद पटेल कनिष्ठ महाविद्यालयात २१ डिसेंबर रोजी हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे मराठी टंकलेखन परीक्षा प्रति मिनिट (३० शब्द) या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा देण्यासाठी मूळ परीक्षार्थी विकास शिक्रेने त्याच्या जागेवर तोतयाला पेपर देण्यासाठी पाठवले. या गैरप्रकारात संशयिताला सानिका कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्युटचे संचालक राजेश सायंकर यांनी मदत करून परीक्षा मंडळाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा…मालमत्ता कर संकलनात २०० कोटींचा टप्पा पार, नाशिक महापालिकेची ऐतिहासिक वसुली

चौकशीत हा गैरप्रकार संस्थेत घडल्याचे निष्पन्न झाल्याची परीक्षा परिषदेने गांभिर्याने दखल घेतली. या प्रकरणी परीक्षार्थी विद्यार्थी, टायपिंग संस्थेचा संचालक आणि तोतया अशा तिघांविरूध्द गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik fake student gave marathi typing test on behalf of maharashtra examination council sud 02